CoronaVirus Live Updates : हृदयद्रावक! कोरोनामुळे पतीचा मृत्यू; विरह सहन न झाल्याने पत्नीची मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2021 10:43 AM2021-10-03T10:43:32+5:302021-10-03T10:44:36+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने आपल्या दोन्ही मुलांसह आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांनी या संकटात आपल्या जवळची माणसं गमावली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल चार लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून रुग्णांच्या संख्येने तीन कोटींचा टप्पा पार केला आहे. दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. कोरोनामुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाली आहे. अशीच एक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. हसतं-खेळतं कुटुंब कोरोनामुळे उद्ध्वस्त झालं आहे. कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्याने पत्नीने आपल्या दोन्ही मुलांसह आत्महत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे.
कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मात्र पतीच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने नैराश्यात असलेल्या पत्नीने मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसंता असं 40 वर्षीय महिलेचं नाव असून तिने आपला मुलगा यशवंत आणि मुलगी निश्चिका यांच्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वसंता यांचे पती बस कंडक्टर होते. कोरोनामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट देखील सापडली आहे. यामध्ये कोरोनामुळे पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर आयुष्य कसं बदललं याबद्दल लिहिलं आहे.
"पतीला विसरून जीवनात पुढे जाणं अशक्य"
वसंता यांनी सुसाईड नोटमध्ये "पतीच्या मृत्यूनंतर मी भयभीत, चिंतीत आणि दिशाहिन होती. त्यांच्या मृत्यूनंतरचा प्रत्येक दिवस माझ्यासाठी अवघड आहे. कोणीच आम्हाला पाहू शकत नाही हे सत्य आता मला समजलं आणि म्हणून आम्ही आत्महत्या करतोय" असं म्हटलं आहे. तसेच "पतीला विसरून जीवनात पुढे जाणं अशक्य आहे. पतीच्या मृत्यूनंतर आता दररोज मी मरणयातना सहन करतेय. आमच्यासाठी आता कोण उभं राहीलं, माझ्या मुलाचं पुढे काय होईल असे असंख्य प्रश्न सध्या समोर आहेत. त्यामुळेच या जगात राहायचं नाही" असंही म्हटलं आहे.
पतीच्या मृत्यूनंतर वसंता नैराश्यात
"कोणालाच माझ्या मुलांची काळजी नाही. नातेवाईकही नीट बोलत नाहीत. पतीच्या मृत्यूनंतर जर नातेवाईकांनी थोडी तरी मदत केली असती तर आम्ही हा टोकाचा निर्णय घेतला नसता" असं देखील वसंता यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीच्या मृत्यूनंतर वसंता या नैराश्यात गेल्या होत्या. त्यामुळेच त्यांच्या भावाने तिच्या आईला तिच्यासोबत राहण्यासाठी पाठवलं होतं. मात्र वसंताने आपल्या दोन्ही मुलांसह घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.