Coronavirus : २१ दिवस लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 03:04 AM2020-03-25T03:04:19+5:302020-03-25T05:26:50+5:30
Coronavirus : देशातील प्रत्येक राज्यात, केंद्रशासित प्रदेशात, जिल्ह्यात, शहरांत, गावखेड्यांत, वस्ती, गल्लीबोळांत आणि रस्त्यांवर २१ दिवस लॉकडाऊन असेल.
नवी दिल्ली : कोरोना विषाणूंच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे (सोशल डिस्टन्सिंग, सामाजिक दुरावा), घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असे कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मध्यरात्रीपासून देशभरात २१ दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. ध्यानात ठेवा ‘जान हैं तो जहाँ हैं, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
मंगळवारी रात्री राष्टÑाला उद्देशून दिलेल्या संदेशात पंतप्रधान मोदी यांनी कोरोना विषाणूंचा वाढता प्रसार, त्याचे होणारे परिणाम, जगभरातील शक्तिशाली देश प्रयत्न करून कसे असहाय झाल्याचे आणि आरोग्यतज्ज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीचा हवाला देत तमाम भारतवासीयांना ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले.
कर्फ्यूच पण जनता कर्फ्यूपेक्षा कठोर
हा एक प्रकारचा कर्फ्यूच आहे. जनता कर्फ्यूपेक्षा कठोर असेल. एवढे २१ दिवस लॉकडाऊनचे पालन केले नाही, तर देश, तुमचे कुटुंब २१ वर्षे मागे जाईल. पंतप्रधान म्हणून नव्हे, तर तुमच्या कुटुंबातील सदस्य या नात्याने मी हे सांगत आहे. तेव्हा २१ दिवस घराबाहेर पडणे विसरून जा.
लॉकडाऊनचा २१ दिवसांचा अवधी खूप आहे. आपणास आर्थिक नुकसानही सोसावे लागेल. तुमचे जीवन, तुमचे कुटुंब, मित्रपरिवार आणि देशासाठी असे करणे जरूरी आहे. तेव्हा प्रत्येक भारतीयाने एकजुटीने आणि संयमाने कोरोना विषाणूंवर विजय मिळविण्याचा संकल्प करूया.
देशातील प्रत्येक राज्यात, केंद्रशासित प्रदेशात, जिल्ह्यात, शहरांत, गावखेड्यांत, वस्ती, गल्लीबोळांत आणि रस्त्यांवर २१ दिवस लॉकडाऊन असेल.
घराबाहेर लक्ष्मणरेषा...
घराबाहेर पडू नका, तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेर एक लक्ष्मणरेषा ओढण्यात आली आहे. ती ओलांडू नका. घरातच राहावे. तुमचे घराबाहेर पडणारे एक पाऊल, काही लोकांच्या निष्काळजीपणाने, काहींच्या गैरसमजुतीने, तुम्हाला, तुमच्या मुला-बाळांना, आई-वडिलांना, तुमच्या कुटुंबाला, मित्रांना आणि पूर्ण देशाला अत्यंत कठीण स्थितीत नेईल. घराबाहेर पडणारे तुमचे एक पाऊल कोरोनासारख्या गंभीर रोगाला तुमच्या घरात आणू शकते.
या सेवा राहतील सुरू
- संरक्षण विभाग, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल, ट्रेझरी (कोषागार), पेट्रोल, सीएनजी, एलपीजी, पीएनजी.
- प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, बँक, विमा कार्यालये आणि एटीएम, दूरसंचार, इंटरनेट सेवा, प्रसारण आणि केबल सेवा, अत्यावश्यक आयटी सेवा, किराणा सामान, फळे आणि भाजीपाला, डेअरी आणि दुधाचे बूथ.
- आपत्ती व्यवस्थापन, वीजनिर्मिती आणि वितरण केंद्रे, पोस्ट आॅफिसेस, राष्ट्रीय माहिती केंद्र, वॉर्निंग एजन्सीज.
- पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण, अग्निशामक आणि अत्यावश्यक सेवा व तुरुंग. जिल्हा प्रशासन, वीज, पाणी, स्वच्छता या सेवा सुरू राहतील. नगरपालिका, महानगरपालिका यांचा कर्मचारी वर्ग केवळ अत्यावश्यक सेवांसाठी म्हणजेच, स्वच्छता, पाणीपुरवठा आदींसाठी उपस्थित असेल.
- ज्या कार्यालयांचे काम सुरू राहणार आहे त्या ठिकाणी किमान कर्मचारी वर्ग असणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनांच्या शाखा (युनिटस्), सतत प्रक्रिया आवश्यक असणाºया उत्पादन शाखा (युनिटस्) यांना आवश्यक त्या परवानग्या राज्य सरकारकडून घ्याव्या लागतील.
- हॉटेल्स, होमस्टेस, लॉजेस आणि मॉटेल्स (लॉक डाऊनमुळे अडकून पडलेले लोक व पर्यटक राहत आहेत ती) वैद्यकीय आणि इतर आणीबाणीतील कर्मचारी वर्ग, हवाई आणि समुद्र सेवा कर्मचारी, क्वारंटाईन सेवांसाठी राखून ठेवलेली व वापरलेली प्रतिष्ठाने लॉकडाऊनला अपवाद असतील.