coronavirus : कोरोनाचे 103 नवे रुग्ण सापडले; संक्रमितांची संख्या 499वर, आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 09:09 AM2020-03-24T09:09:51+5:302020-03-24T09:10:43+5:30
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्लीः भारतात जीवघेण्या कोरोना व्हायरसनं हाहाकार माजवला आहे. एका दिवसांत देशभरात कोरोनाचे नवीन 103 रुग्ण समोर आले आहेत. तसेच या रोगानं आतापर्यंत 10 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 499वर गेली आहे. महाराष्ट्रात जवळपास 97 रुग्ण कोरोना बाधित आढळले असून, तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये 60 लोक संक्रमित झाल्याचे समोर आले आहे. या जीवघेण्या रोगाला थोपवण्यासाठी 30 राज्यांनी लॉक डाऊन केलं आहे. पंजाब, महाराष्ट्र, चंदीगडमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. दिल्लीतही कर्फ्यूसदृश्य परिस्थिती आहे.
इतर राज्यांची काय परिस्थिती?
कर्नाटकात 33 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, तर एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशात 30 लोक कोरोना संक्रमित आहेत. दिल्लीत 29 लोकांना याची बाधा झाली असून, एकाचा मृत्यू झाला आहे. गुजरातमध्ये 29 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. हिमाचलमध्येही 3 संक्रमित असून, एकाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात संक्रमितांची संख्या 97 असून, आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. पंजाबमध्ये 21 जण संक्रमित आढळले असून, एकाचा मृत्यू ओढवला आहे. पश्चिम बंगालमध्ये सात जणांना संसर्ग झालेला असून, एकाचा मृत्यू झाला आहे. या विषाणूला नियंत्रित करण्यासाठी सरकारनं काही निर्बंध लादले असून, त्याचे उल्लंघन करणार्यांवर केंद्र सरकारने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरसमुळे जगभरात 14,500हून अधिक लोक मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पंजाब सरकारने सोमवारी कर्फ्यू लावला आहे. लोक लॉकडाऊन असताना रस्त्यावर फिरत असल्यानं मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी कर्फ्यूची घोषणा केली. यावेळी, अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवांवर बंदी घातली जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही लोक लॉकडाऊन नियमांचे गांभीर्याने पालन करत नसल्यानं नाराजी व्यक्त केली आहे. जनतेनं लॉकडाऊन नियमांचे योग्य प्रकारे पालन कसे होईल, याची काळजी घ्यावी, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. दिल्ली, महाराष्ट्र, झारखंड आणि नागालँडने राज्यव्यापी लॉकडाऊन जाहीर केले आहे, तर बिहार, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्येही जमावबंदी करण्यात आली आहे. केरळ, राजस्थान आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांनी आधीच अंशतः किंवा पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली आहे. .
लॉकडाऊनचं उल्लंघन केल्यास होणार कारवाई
दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईसह देशभरातील 80 जिल्ह्यांमध्ये 31 मार्चपर्यंत रेल्वे आणि आंतरराज्यीय बससेवा स्थगित ठेवून लोकांच्या प्रवास आणि वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन करणा-या लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यास केंद्र सरकारने राज्य सरकारांना सांगितले आहे. लॉकडाउनची अंमलबजावणी महाराष्ट्रभर झाली आहे. मुंबईत बससेवा बंद करण्यात आल्या असून, जिल्ह्यांच्या हद्दींनाही सील ठोकण्यात आले आहे. दिल्लीतल्या एम्सने ओपीडी, विशेष सेवांसह सर्व नवीन व वृद्ध रुग्णांची नोंदणी आजपासून पुढील आदेश होईपर्यंत थांबविण्याचे आदेश जारी केले आहेत. यापूर्वी एम्सने कोविड 19 साथीच्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी 23 मार्चपासून रुग्णांची नियमित वॉल्किन ओपीडी नोंदणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी एम्सने सांगितले की, सर्व अनावश्यक शस्त्रक्रिया व उपचार पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 21 मार्चपासून केवळ आपत्कालीन शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे निर्देश देण्यात आले. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णालये आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांना योग्य प्रमाणात व्हेंटिलेटर आणि उच्च-प्रवाहित ऑक्सिजन पुरवठा खरेदी करण्यास सांगितले आहे. यासह रुग्णालयाच्या आवारात गर्दी कमीत कमी ठेवण्यास सांगण्यात आले आहे.