Lockdown : GoAir एप्रिल महिन्याचा पगार कर्मचाऱ्यांना देणार नाही, सांगितलं असं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 06:50 PM2020-05-04T18:50:01+5:302020-05-04T19:52:44+5:30
कोरोनामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्र सरकारने पुन्हा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे विमानसेवेवर परिणाम होत आहे. 25 मार्चपासून विमानसेवा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे विमान कंपन्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. दरम्यान, गोएअर (Go Air)ने कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. Go Airच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार देण्यात येणार नाही.
एअरलाइन्सकडून म्हटले आहे की, लॉकडाऊनचा दुसरा महिना सुरु आहे. आशा आहे की, आपण सर्वजण सुरक्षित आणि स्वस्थ असून सध्याची परिस्थिती चांगल्यारितीने समजावून घेत आहात. कोरोनामुळे देशात 17 मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, गोएअरने 31 मेपर्यंत सर्व फ्लाइट्सवर रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच, तिकीट बुकिंगवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे 1 जूनच्या आधी विमानसेवा सुरु होण्याची शक्यता नाही आहे. तसेच, सरकारकडून कोणतीच आर्थिक मदत मिळत नाही. मात्र, आम्ही नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या सतत संपर्कात आहोत, असे एअरलाइन्सकडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान, ज्यावेळी सुरुवातीला 25 मार्च ते 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. त्यावेळी बहुतेक विमान कंपन्यांनी 15 एप्रिलपासून उड्डाणे सुरू करण्याचा विचार केला होता. मात्र, लॉकडाऊन आणखी वाढविल्यामुळे उड्डाणे सुरू झाली नाहीत. त्यामुळे एअरलाइन्सने गोएअरच्या बहुतांश कर्मचार्यांना 3 मे पर्यंत रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला होता. तर एप्रिल महिन्यात जितके दिवस काम केले आहे. तितक्याच दिवसांचा पगार कर्मचार्यांना मिळेल, असे स्पाइसजेटने सांगितले होते.