हातात पैसे नसताना गरीब कसे जगू शकतात?, चिदंबरम यांचा मोदी सरकारला सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 02:04 PM2020-04-13T14:04:55+5:302020-04-13T15:18:59+5:30
मर्यादित संसाधनांसोबत राज्यांनी गरिबांना थोडीफार मदत केली आहे, असे पी. चिदंबरम म्हणाले.
नवी दिल्ली : काँग्रेसने देशात सुरु असलेल्या लॉकडाऊनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर निशाणा साधला आहे. हातात पैसे नसताना गरीब लोक जेवण आणि औषधे कशी खरेदी करु शकतात?, लॉकडाऊनच्या काळात ते जीवन कसे जगतील? असे सवाल करत यांचे उत्तर केंद्र सरकारने दिले पाहिजे, असे काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. तसेच, मर्यादित संसाधनांसोबत राज्यांनी गरिबांना थोडीफार मदत केली आहे, असेही पी. चिदंबरम म्हणाले.
मोदी सरकारवर निशाणा साधत पी. चिदंबरम म्हणाले, "केंद्र सरकारने आवश्यक सुविधांसाठी राज्यांना निधी दिला नाही. तसेच, केंद्र सरकारने प्रत्येक गरीब कुटुंबीयाच्या बँक खात्यात थेट पैसे जमा केले नाहीत. याबद्दल आम्ही कडक शब्दांत निषेध करतो." याचबरोबर, पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला एक सल्लाही दिला आहे. केंद्र सरकार आपल्या २०२०-२१ च्या ३० लाख कोटीहून अधिक खर्च बजेटमधून ६५,००० कोटी रुपयांपर्यंत सहज काढू शकते. अर्थतज्ज्ञांनी सांगितले आहे की, केंद्र सरकारने जास्तकरून उधार घेतले पाहिजे. हा सुद्धा अर्थतज्ज्ञांचा सल्ला चांगला आहे, असे पी. चिदंबरम यांनी सांगितले.
दरम्यान, देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. देशात आतापर्यंत ९ हजार १५२ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये सध्या ७ हजार ९८७ रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर ३०८ जणांचा मृत्यू झाला असून ८५७ रुग्ण बरे झाले आहेत. दिल्ली, मुंबई, इंदूर आणि जयपूर याठिकाणी कोरोना बाधित रुग्णांची संख्या जास्त आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु केले आहे. मात्र, कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होणारी वाढ पाहता लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्र, ओडिसा, पंजाब या राज्यांसह काही राज्यांनी ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.