CoronaVirus लॉकडाऊन वाढला; रेल्वे सेवाही बंदच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 12:06 PM2020-04-14T12:06:49+5:302020-04-14T12:08:25+5:30
काही दिवसांपूर्वी १४ एप्रिलपासून बुकिंग सुरु होणार असल्याची अफवा पसरविण्यात येत होती. मात्र, रेल्वेने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले होते.
मुंबई : देशात लागू असलेला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली. यामुळे रेल्वे सेवाही बंद राहणार आहे.
काही दिवसांपूर्वी १४ एप्रिलपासून बुकिंग सुरु होणार असल्याची अफवा पसरविण्यात येत होती. मात्र, रेल्वेने हे वृत्त खोटे असल्याचे स्पष्ट केले होते. आता लॉकडाऊन वाढल्याने रेल्वे सेवाही बंदच राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. देशातील सर्व मेल, एक्स्प्रेस, मेट्रो, लोकल या ३ मे पर्यंत बंद ठेवण्याचे येणार असल्याचे पत्रक रेल्वे बोर्डाने काढले आहे.
या काळात ज्या ट्रेन रद्द झाल्या आहेत त्यातील तिकिटांचा पूर्ण रिफंड प्रवाशांना मिळणार आहे. तसेच पुढील सेवा कधीपासून सुरु होईल याबाबत आताच सांगणे शक्य नसल्याचेही रेल्वेने कळविले आहे. आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास एखादवेळी ट्रेन सुरु होतील, याची आगाऊ घोषणा केली जाईल. मात्र, ३ मे पर्यंत आगाऊ बुकिंग बंद करण्यात आले आहे. मालवाहतूक सुरुच राहणार आहे.