Coronavirus: १४ एप्रिलनंतर देशात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता; केंद्र सरकार लवकरच निर्णय घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2020 03:42 PM2020-04-07T15:42:36+5:302020-04-07T15:44:59+5:30
देशात कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ मार्च रोजी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता.
नवी दिल्ली – कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात १४ एप्रिलपर्यत २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. मात्र देशात कोरोनाग्रस्तांचा वाढती संख्या पाहून लॉकडाऊन वाढवणार की संपवणार याबाबत कमालीचा सस्पेन्स ठेवण्यात आला आहे. देशात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे अशी चर्चा सुरु आहे. सरकारी सूत्रांनुसार अनेक राज्यांनी केंद्राकडे लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस केली आहे.
केंद्र सरकारच्या सूत्रांनुसार, अनेक राज्यातील सरकारने आणि तज्ज्ञांनी केंद्र सरकारकडे लॉकडाऊन वाढवण्याची शिफारस केली आहे. केंद्र सरकार राज्यांच्या आणि तज्ज्ञांच्या शिफारशीवर विचार करत आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतर देशात लॉकडाऊन वाढवणार की, काही टप्प्यात लॉकडाऊन शिथील करणार याबाबत केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट केली नाही.
देशात कोरोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २५ मार्च रोजी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. लॉकडाऊनची शेवटची तारीख १४ एप्रिल आहे. त्यामुळे १४ एप्रिलनंतर देशात सर्वकाही सुरळीत होईल असा भ्रम काही नागरिकांना आहे. ज्या भागात कोरोना हॉटस्पॉट नाही अशा भागात केंद्र सरकार लॉकडाऊन उठवेल अशी चर्चा होती. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेमधून केंद्र सरकार याबाबत काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. दरम्यान तेलंगणा सरकारने केंद्र सरकारला लॉकडाऊन आणखी काही आठवडे वाढवण्याची शिफारस केली आहे. अशावेळी लॉकडाऊन ३ जूनपर्यंत वाढवण्याची मागणी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची आकडा ९०० पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे राज्यातही लॉकडाऊनबाबत लॉकडाऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सूचक भाष्य केलं आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही, याचा निर्णय कॅबिनेटच्या बैठकीत घेतला जाईल. पुढील चार-पाच दिवसांत याबद्दलचा निर्णय होईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबद्दलची माहिती देतील. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य पावलं उचलली जातील. लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी तशी मानसिकता ठेवावी आणि सहकार्य करावं, असं देशमुख म्हणाले आहेत.