VIDEO: धक्कादायक! गाडी रोखणाऱ्या पोलिसाला बोनेटवर टाकून 'तो' सुस्साट सुटला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 12:21 PM2020-05-02T12:21:43+5:302020-05-02T12:22:15+5:30
पंजाबच्या जालंधरमधील धक्कादायक प्रकार; ताब्यात घेतलेल्या चालकाची चौकशी सुरू
जालंदर: तपासणीसाठी कार रोखणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला बोनेटवर टाकून गाडी पुढे दामटवल्याचा धक्कादायक प्रकार पंजाबच्या जालंदरमध्ये घडला आहे. लॉकडाऊन असल्यानं पोलीस अधिकाऱ्यानं कार थांबवण्यास सांगितली. त्यावेळी कारच्या चालकानं कार न थांबवता ती पुढे चालवत नेली. त्यामुळे कारसमोर असलेला पोलीस अधिकारी थेट बोनेटवर पडला. यानंतरही चालक थांबला नाही. त्यानं काही अंतर कार पुढे नेली. आसपासच्या लोकांनी बराच आरडाओरडा केल्यानंतर चालक थांबला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मिल्कीबार चौकात हा प्रकार घडला.
'मिल्कीबार चौकात आलेल्या एका कारला थांबण्याची सूचना करण्यात आली. मात्र चालक थांबला नाही. त्यावेळी सहाय्यक वरिष्ठ निरीक्षक मुल्कराज कर्तव्यावर होते. चालकानं कार न थांबवल्यानं त्यांनी जीव वाचवण्यासाठी बोनेटवर उडी मारली. चालकानं त्याही परिस्थितीत कार काही अंतर पुढे नेली. अनेकांनी आरडाओरडा केल्यामुळे आणि कारच्या मागे धाव घेतल्यानं चालकानं कार थांबवली. कार चालकाला ताब्यात घेण्यात आलं असून घटनेची चौकशी सुरू आहे,' अशी माहिती पोलीस अधिकारी सुरजीत सिंग यांनी दिली.
#WATCH Punjab: A car driver drags a police officer on car's bonnet in Jalandhar, after the officer tried to stop the vehicle today, amid #COVID19 lockdown. pic.twitter.com/IZUuTHapsK
— ANI (@ANI) May 2, 2020
गेल्या महिन्यात पंजाबच्याच पटियालामध्ये पोलिसांवर अतिशय गंभीर स्वरुपाचा हल्ला झाला होता. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा हात शरीरापासून वेगळा झाला. शस्त्रक्रिया करुन हात जोडण्यात आला. १२ एप्रिल रोजी पटियालाच्या भाजी मंडईत येणारी कार पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. या कारमधील निहंग शीखांनी बॅरिकेड्सला धडक दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांवर तलवारीनं हल्ला केला. त्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा हात कापला गेला.