CoronaVirus Lockdown News: देशात पुन्हा लॉकडाऊन होणार?; नेमक्या शब्दांत अमित शहांनी बरंच काही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 08:03 AM2021-04-19T08:03:11+5:302021-04-19T08:04:03+5:30
CoronaVirus Lockdown News: देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ; अनेक राज्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हं
नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत हा आकडा २ लाखांवर पोहोचला. यानंतर काल देशात २ लाख ६१ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, दिल्लीपाठोपाठ उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यावर गृहमंत्री अमित शहांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं आहे.
मोठी बातमी! संपूर्ण देशात लवकरच लॉकडाऊनची घोषणा?; उच्चस्तरीय बैठकीत झालं एकमत
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेतलं. या लाटेकडे दुर्लक्ष करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, असं अमित शहा म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर अवलंबून असेल. राज्य यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असं शहांनी म्हटलं. 'भारतच नव्हे, अन्य देशांमध्येही कोरोनाची दुसरी लाट जास्त भीषण ठरली. दुसऱ्या लाटेनं जगभरात प्रचंड मोठी हानी झाली. पण इतर देशांची लोकसंख्या आणि तिथे झालेलं नुकसान पाहता भारतानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात चांगली कामगिरी केली आहे,' असं गृहमंत्री म्हणाले. ते 'टाईम्स नाऊ' या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
"कोरोनाला रोखण्यासाठी सरकार अधिक कठोर पावले उचलणार, मेमध्येही महाराष्ट्रात निर्बंध लागू राहणार’’
सध्या देशात सर्वत्र ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यानं अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र देशात ऑक्सिजन, रेमडेसिविरचा कोणताही तुटवडा नसल्याचं शहांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत, असंदेखील ते पुढे म्हणाले. प्रचारसभांमध्ये निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होत आहे. मोदींच्या सभांमध्ये सर्व नियम पाळले जात असल्याचं शहांनी सांगितलं.
बंगालमध्ये २०० जागा जिंकू; शहांना विश्वास
पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष कमीतकमी २०० जागा जिंकेल, असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला. जय श्रीराम ही घोषणा केवळ धार्मिक नाही. यामधून बंगालच्या जनतेचं दु:ख समोर येतं. सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी लागू झाल्यानंतर अल्पसंख्याकांच्या हितांचं संरक्षण कशाप्रकारे करण्यात येईल, असा प्रश्न शहांना विचारण्यात आला. या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. हे प्रश्न कायद्यांच्या अंमलबजावणीनंतर विचारले जायला हवेत, असं गृहमंत्री म्हणाले.