Coronavirus, Lockdown News: दिल्ली मेट्रोची दीड महिन्यात १२०० कोचची देखभाल; कधीही धावण्यास सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 10:57 PM2020-05-04T22:57:40+5:302020-05-04T22:58:00+5:30
दिल्ली मेट्रो : लॉकडाऊनमध्ये केल्या तीन हजारावर फेऱ्या
नवी दिल्ली : लॉकडाऊनमध्ये डीएमआरसी प्रशासनाने मेट्रो कोच तांत्रिकदृष्ट्या सुसज्ज केले आहेत. एसी सर्व्हिसिंगपासून ते दिव्यांची दुरूस्ती, फ्लोअरची स्वच्छता या काळात करण्यात आली. तब्बल १२०० कोचच्या स्वच्छतेसाठी एचवीएसी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
शक्यतो दिवसभराच्या फेºया संपल्यानंतर मेट्रो कोचची स्वच्छता केली जाते. अत्याधुनिक बनावटीमुळे कोचची स्वच्छता, देखभाल सोपे झाले आहे. डीएमआरसी प्रशासनाने कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवासाची मार्गदर्शिकाही तयार केली आहे. लॉकडाऊन संपल्यावर मेट्रो वाहतुकीस परवानगी मिळाली तरी सर्व मार्गावर एकाच वेळी मेट्रो सुरू होणार नाही. टप्प्याटप्प्याने कमी गर्दीच्या मेट्रो स्थानकांमध्ये मेट्रो धावेल. मात्र त्यासाठी कोणताही दिवस अद्याप निश्चित नाही जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी रेल्वेच्या जोडीला मेट्रोदेखील धावली.
कधीही धावण्यास सज्ज
मेट्रो रेल्वे दीड महिन्यांच्या काळात ३५०० वेळा रूळावर धावली जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक, औषधे, आरोग्य उपकरणांना दिल्लीत नेण्यात आले. विशेष म्हणजे मेट्रोचे रौप्यमहोत्सवी वर्ष यंदा संपले. या २५ वर्षांच्या काळात मेट्रोने दिल्लीकरांची सेवा केली. मेट्रोत सदैव एसी सुरू असतो. त्यामुळे तेथे कोणत्याही संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराचा सर्वाधिक धोका असतो. त्यासाठी व्हेंटिलेशन, एसीची दुरूस्ती व स्वच्छता नियमित राखावी लागते. औषध फवारणीदेखील आता केली जाईल. त्यासाठी विशेष रसायन खरेदी करण्यात आले आहे. रसायन फवारणी करून कोचेसची निगा राखली जाते. या १२०० कोच कधीही धावण्यासाठी आता सज्ज आहेत.