Coronavirus, Lockdown News: दहा लाख लोकांना रेल्वे पोहोचविणार गावी; राज्यांना द्यावे लागतील तिकिटाचे पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 01:02 AM2020-05-04T01:02:37+5:302020-05-04T07:25:01+5:30
कामगार, मजूर, विद्यार्थी, यात्रेकरूंचा समावेश; ४० लाख नागरिक अडकले विविध राज्यांत
नवी दिल्ली : देशव्यापी लॉकडाऊनमुळे विविध भागांत अडकलेल्या दहा लाखांहून अधिक कामगार, मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू आणि पर्यटकांना दहा दिवसांत त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी भारतीय रेल्वे जोरदार तयारी करीत आहे. एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना इच्छित ठिकाणी रेल्वेने नेण्याचा हा स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रयोग होय.
लॉकडाऊमुळे विविध राज्यांत अडकलेल्या लोकांची माहिती राज्यांकडून युद्धपातळीवर गोळा केली जात असून, या लोकांची संख्या ४० लाख असल्याचा अंदाज आहे. तथापि, रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले की, यापैकी १० लाख लोकांना रेल्वेने त्यांच्या गावी पोहोचविले जाईल. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून २० डब्यांच्या ट्रेनमध्ये १,०५० प्रवासी असतील. वाढीव लॉकडाऊन १७ मे रोजी संपण्याआधीच हे काम पूर्ण केले जाणार आहे.
श्रमिक एक्स्प्रेस चालविणार
गुजरातमध्ये सर्वाधिक २० लाख लोक अडकले असून, त्यानंतर महाराष्टÑ, दिल्ली, तेलंगणा, कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान, प. बंगाल, ओडिशा आणि अन्य राज्यांतही मोठ्या संख्येने लोक लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. रेल्वेतर्फे हजार ते बाराशे ‘श्रमिक एक्स्प्रेस’ चालविल्या जातील. राज्य सरकारतर्फे आपल्या राज्यांतील लोकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली असून, या बसेसने अन्य लोक आपापल्या इच्छित ठिकाणी रवाना होतील.
विविध राज्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अडकलेल्या २० ते २२ लाख लोकांना बिहारला जायचे आहे. ७ ते ८ लोकांना उत्तर प्रदेशला जायचे आहे. विविध भागांत अडकलेल्या आपल्या राज्यांतील लोकांना आणण्यासाठी या दोन्ही राज्यांनी केलेली बस प्रवासाची ही आजवरची सर्वात भव्य व्यवस्था असेल. कुंभमेळा किंवा छटपूजेसारख्या धार्मिक कार्यक्रमासाठी एकाच ठिकाणी केल्या जाणाºया व्यवस्थेपेक्षाही ही व्यवस्था वेगळी आहे.
इतर राज्यांत अडकलेल्या स्थलांतरित लोकांना आणण्यास राजी नसलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी हे मोठे आव्हान आहे. केंद्र सरकारने त्यांना बिहारमध्ये पोहोचविण्याचे मान्य केल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांना या लाखो लोकांना राज्यात प्रवेश देण्याशिवाय गत्यंतर नाही. परतलेल्या लोकांना आधी चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन करणे आणि मोठ्या प्रमाणावर त्यांच्या चाचणीसाठी व्यवस्था करावी लागणार आहे.
रेल्वे या प्रवाशांसाठी तिकीट आकारणार असल्याने राज्यांवर आर्थिक बोझा पडणार आहे. राज्याच्या मागणीनुसार प्रवास तिकिटे संबंधित राज्यांना दिले जातील. राज्य सरकारने ही तिकिटे प्रवाशांना देऊन त्यांच्यांकडून तिकिटाचे पैसे घेऊन ते रेल्वेकडे द्यावेत, असे रेल्वेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.
लॉकडाऊननंतर राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या ५०० विद्यार्थ्यांसह ४० बस रविवारी सकाळी दिल्लीत दाखल झाल्या. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर या विद्यार्थ्यांना आपापल्या घरी सोडण्यात आले.कोटामधील सर्व विद्यार्थ्यांना परत आणले असून, त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती नोडल अधिकारी राजीव सिंग यांनी दिली. परिवहनमंत्री कैलाश गेहलोत म्हणाले की, बस काश्मिरी गेट येथे पोहोचल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि नंतर त्यांना घरी सोडण्यात आले. दिल्ली सरकारने विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाठवलेल्या बस शनिवारी सकाळी कोटा येथे पोहोचल्या. बससोबत गेलेल्या अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबवताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले.
विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग
बसमध्ये बसण्यापूर्वी सर्व विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग करण्यात आली. एका बसमध्ये २० ते २२ विद्यार्थ्यांना बसवण्यात आले होते. बसमध्ये वैद्यकीय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना परत नेण्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारीही उपस्थित होते. मुले घरी परतत असल्याने पालकांनी आनंद व्यक्त केला.