देशातील लॉकडाउनचे निर्बंध फारच कडक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 05:22 AM2020-04-09T05:22:24+5:302020-04-09T05:22:39+5:30
राजीव बजाज; कोरोनाविरूद्धच्या लढ्याबाबत व्यक्त केली चिंता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विरुद्धच्या लढ्यात औद्योगिक क्षेत्राला सरकारकडून अत्यल्प पाठिंबा मिळाला असून देशातील लॉकडाऊनचे निर्बंध फारच कडक असल्याची खंत उद्योजक राजीव बजाज यांनी व्यक्त केली आहे. उद्योगांना आपल्या बळावरच या संकटाचा मुकाबला करावा लागेल. या संकटातून वाचण्यासाठी उद्योजकांना पदरमोड करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असे मतही बजाज आॅटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी व्यक्त केले आहे.
एका अर्थविषयक इंग्रजी दैनिकामधील लेखामध्ये राजीव बजाज यांनी म्हटले आहे की, कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी भारतात करण्यात आलेले लॉकडाउन हे भरमसाठ प्रमाणात असून अन्य कोणत्याही देशाने असे केलेले नाही. सरकारने योजलेल्या या उपायामुळे आपण या विषाणू विरुद्धच्या लढ्यामध्ये कमजोर होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेची चाके फिरती ठेवण्यासाठी आपण आपल्यामधील वृद्ध आणि दुबळ्या व्यक्तींना घरी ठेवू. सर्व सार्वजनिक ठिकाणे बंद करू मात्र योग्य ती दक्षता घेऊन तरूण आणि सशक्त लोकांना काम करण्यासाठी परवानगी दिल्यास अर्थव्यवस्थेची चाके फिरती राहतील. मात्र हे करताना स्वच्छता, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग ही तत्वे पाळणे अतिशय महत्वाचे ठरणारे असल्याचे प्रतिपादनही बजाज यांनी या लेखामध्ये केले आहे.
सर्वच भारतीय हे अडाणी, गावंढळ आणि कोणतीही शिस्त नसलेले आहेत, असे माझे मुळीच मत नाही. त्यामुळे त्यांना हाकण्यासाठी मेंढ्यांच्या कळपाला जसा कोणीतरी हवा असतो, तशा व्यक्तीची गरज नाही, हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. त्यामुळे सध्याचे धोरण हे भविष्यात चालू ठेवणे योग्य ठरणारे नाही. त्यामुळेच जर व्हायरसवर नियंत्रण आले नाही तर लॉकडाउन वाढविले जाण्याची वाटत असलेली भीती अनाठाई नसल्याचेही बजाज यांनी म्हंटले आहे.
आपले सुमारे अर्धे उत्पादन निर्यात करणारी बजाज आॅटो ही नफा कमविणारी कंपनी असून कंपनीवर कोणतेही कर्ज नाही. त्यामुळेच आम्ही आजही चांगल्या परिस्थितीमध्ये आहोत. त्यामुळेच आमचे डीलर्स, पुरवठादार आणि सर्व प्रकारचे कामगार यांना असे आश्वासन देतो की, येत्या १४ तारखेपर्यंतच्या लॉकडाउनला तोंड देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असेही बजाज यांनी म्हंटले आहे.
जोपर्यंत सध्याची परिस्थिती पूर्वपदावर येत नाही तोपर्यंत उद्योगांना आपले अंदाजपत्रक रोखून धरावे लागणार आहे. तसेच त्यांचे मार्केटिंगचे बजेट शून्यावर येणार आहे. त्याचप्रमाणे डीलर्स क्रेडीटवरील व्याज माफ करण्याची मागणी करतील. तसेच कामगारांच्या पगारातही कपात करावी लागण्याची शक्यता दिसत आहे. या घडीला तरी नोकर कपातीची शक्यता दिसत नसल्याचे त्यांनी या लेखामध्ये पुढे म्हटले आहे.
होमिओपॅथीला
का वगळले?
भारतामध्ये स्वतंत्र असे आयुष मंत्रालय असून होमिओपॅथीतील जगातील चांगले संशोधन केंद्र असताना कोरोना विरुद्धच्या लढ्यामधून होमिओपॅथीला का वगळले गेले ते समजू शकत नाही, असे बजाज यांनी म्हंटले आहे. होमिओपॅथीचे फारसे साईड इफेक्ट नसल्याचे जगभर मान्य झाले असताना या पॅथीला वगळणे चुकीचे आहे. त्याचप्रमाणे निसर्गाेपचारांचाही उपयोग या लढ्यासाठी करता येऊ शकेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे.