IITची पोरं हुश्शार... कोरोनाशी लढाईसाठी स्वस्त टेस्ट किट, पोर्टेबल व्हेंटिलेटर, ड्रोन तय्यार!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 07:00 AM2020-06-17T07:00:00+5:302020-06-17T07:00:12+5:30
Positive News on Coronavirus: कोरोनाविरुद्धचा लढा सुकर करण्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी – (आयआयटी) एकापेक्षा एक भारी उपकरणं तयार केली आहेत.
नवी दिल्लीः कोरोना विषाणूविरुद्धच्या लढाईत प्रत्येक जण आपापलं योगदान देतोय. कोरोना वॉरियर्स दिवसरात्र झटताहेत, दानशूर मंडळी सढळ हस्ते मदत करताहेत, स्वयंसेवी संस्था गरिबांना आधार देताहेत, तर अनेक कुटुंब आपल्यातील घास गरजूंसोबत शेअर करताहेत. जगभरात कोरोनाची लस आणि औषधावर संशोधन सुरू आहे. पण, ते सापडेपर्यंत या कोरोना संकटाशी आपल्याला दोन हात करावे लागणार आहेत. याच लढ्यासाठी देशभरातील वेगवेगळ्या भारतीय तंत्रज्ञान संस्थांनी – (आयआयटी) एकापेक्षा एक भारी उपकरणं तयार केली आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे, या हायटेक वस्तू आणि उपकरणं लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहेत.
परवडणारी कोरोना टेस्ट किट्स, स्वस्त पोर्टेबल व्हेंटिलेटर, डिजिटल स्टेथोस्कोप, निर्जंतुकीकरणासाठी ड्रोन, आयसोलेशन वॉर्डांसाठी विल्हेवाट लावता येण्याजोगे बांबूचे फर्निचर, रुग्णालयांसाठी संसर्गरोधक कापड, अशी अत्यंत उपयुक्त साधनं आयआयटींमधील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी लॉकडाऊन काळात तयार केली आहेत. दिल्ली आयआयटी निर्मित कोविड-१९ टेस्ट किटला तर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) मंजुरीही दिली आहे. त्यानंतर आता, या उपकरणांची व्यापारी तत्त्वावर निर्मिती सुरू व्हावी आणि ती विक्रीसाठी बाजारात यावीत, यादृष्टीनंही तयारी झालीय. आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या स्टार्ट-अपच्या माध्यमातून किंवा पेटंट स्वतःकडेच ठेवत काही नामांकित कंपन्यांना निर्मिती परवाना द्यायचं आयआयटींनी ठरवलंय.
आयआयटी-दिल्लीनं आपल्या कोविड-१९ टेस्ट किटच्या उत्पादनासाठी बेंगळुरू येथील जिनी लॅबोरेटरीज या जैव तंत्रज्ञान कंपनीला खुला परवाना दिला आहे. विशेष म्हणजे, या किटची किंमत ५०० रुपयांपेक्षा जास्त ठेवता येणार नाही, अशी अटच त्यांनी घातली आहे. एकूण ४० कंपन्यांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. मात्र, दर्जात्मक निकष पूर्ण करतील आणि किंमत न वाढवण्याची हमी देतील अशाच कंपन्यांना आम्ही परवाना देणार आहोत. त्यात जिनी लॅबोरेटरीजची आत्ता निवड केली आहे. त्यांनी आंध्र प्रदेश मेड टेक झोनमध्ये या किट्सचं उत्पादन सुरू केलंय आणि दहा दिवसांत ही किट बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही रामगोपाल यांनी वृत्तसंस्थेला दिली.
आयआयटी-दिल्लीनेच संसर्गरोधक कापड देखील तयार केलं आहे. एम्समध्ये त्याची चाचणी यशस्वी झाली होती. हॉस्पिटलच्या खाटांवरील चादरी, पडदे आणि डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉईज आणि रुग्णांच्या गणवेशांसाठी हे कापड उपयुक्त, परिणामकारक ठरू शकतं. सुती कापडावर विशिष्ट प्रकारे रासायनिक प्रक्रिया करून हे कापड तयार करण्यात आलंय. वारंवार धुतल्यानंतरही त्याची जीवजंतूरोधक क्षमता कमी होत नसल्याचं प्राध्यापक सम्राट मुखोपाध्याय यांनी सांगितलं.
आयआयटी-मुंबईने तयार केलेल्या डिजिटल स्टेथोस्कोपच्या मदतीने डॉक्टर काही अंतरावरूनही रुग्णाच्या हृदयाचे ठोके ऐकू शकतात. त्या ठोक्यांची नोंदही या उपकरणात होते. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्णांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग राखलं जाऊ शकतं आणि आजच्या काळात ते अत्यंत आवश्यक आहे. हा स्टेथोस्कोप बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेच, पण आयुडिव्हाइस या स्टार्ट अपने १००० डिजिटल स्टेथोस्कोप देशभरातील विविध रुग्णालयं आणि आरोग्य केंद्रांना पाठवलेत.
आयआयटी – गुवाहाटीच्या ‘मारुत ड्रोनटेक’ या स्टार्टअपनं दोन प्रकारचे ड्रोन तयार केलेत. या ड्रोनचा वापर सार्वजनिक ठिकाणांच्या निर्जंतुकीकरणासाठी करता येतो. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत सॅनिटायझिंग ड्रोनने ५० पट अधिक क्षेत्राचं निर्जंतुकीकरण होत असल्याचा दावा संस्थेनं केला आहे. सार्वजनिक स्थळांवर देखरेख करण्यासाठी आणि सूचना देणारा ड्रोनही आयआयटी-गुवाहाटीने विकसित केल्याची माहिती माजी विद्यार्थी प्रेमकुमारने दिली. संस्थेच्या डिझाइन विभागाने बांबूपासून हॉस्पिटल फर्निचर तयार केलंय. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आणि इनडोअर स्टेडियममध्ये तयार करण्यात येणाऱ्या आयसोलेशन वॉर्डांमध्ये हे फर्निचर उपयुक्त ठरू शकतं. रोज २०० खाटा सहज तयार करता येऊ शकतील, इतकं साधं हे डिझाईन असून प्रसंगी त्याची लगेच विल्हेवाटही लावता येऊ शकते. सध्या दोन स्थानिक उद्योजक या खाटांची निर्मिती करत असल्याची माहिती प्राध्यापकांनी दिली.
आयआयटी कानपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी कमी खर्चाचे आणि पोर्टेबल व्हेंटिलेटर्सचं संशोधन केलंय. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या सहकार्याने ते या उपकरणांची निर्मिती करत आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या व्हेंटिलेटर्सची किंमत ४ लाखांच्या आसपास आहे. मात्र, हे पोर्टेबल व्हेटिंलेटर्स ७० हजार रुपयांत उपलब्ध होतील. ‘मेड इन इंडिया’ साधनं वापरून हे व्हेंटिलेटर्स तयार करण्यात येत आहेत, असं संचालक अभय करंदीकर यांनी सांगितलं. २०२० मध्ये ३० हजार व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीचं ध्येय असून पहिल्या टप्प्यातील व्हेंटिलेटर्स लवकरच बाजारात दाखल होतील, असंही त्यांनी सांगितलं.
Disclaimer: फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.