coronavirus : पुढच्या महिन्यापासून योगी सरकार देणार गहू आणि तांदळाबरोबरच डाळ मोफत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 09:00 PM2020-04-21T21:00:36+5:302020-04-21T21:09:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे.
लखनऊः मे महिन्यापासून रेशनकार्ड धारकांना डाळीसह गहू व तांदूळ मोफत देण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारनं घेतला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रति रेशनकार्ड एक किलो डाळ देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूच्या वाढत्या परिणामामुळे लॉकडाऊनमध्ये गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी मोफत रेशन देण्यास सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशचे योगी सरकारही या योजनेंतर्गत 15 एप्रिलपासून पाच किलो तांदूळ मोफत वाटत आहे. आता या महिन्यापासून डाळही देण्यात येणार आहेत, परंतु डाळींचे वेळेत वाटप न झाल्याने ती पुढील महिन्यात मिळणार आहे. मेमध्ये एप्रिलची डाळदेखील ग्राहकांना दिली जाणार आहे. म्हणजेच मे महिन्यात प्रत्येक शिधापत्रिकाधारकास दोन किलो डाळ मोफत देण्यात येणार आहे.
बहुतेक जिल्ह्यांमध्ये चण्याची डाळ वाटण्याची तयारी सुरू आहे. सहारनपूर विभागातील अनेक ठिकाणी उडदासह अन्य डाळी पुरवल्या जातील. अन्न विभागाचे प्रधान सचिव देवेश चतुर्वेदी म्हणाले की, पुढील महिन्यात सर्व शिधापत्रिकाधारकांना डाळी मोफत दिल्या जाणार आहेत. याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पुढील महिन्यात एप्रिलची डाळही सर्व शिधापत्रिकाधारकांना मिळणार आहे.
31 लाख कुटुंबातील 1.25 कोटी सदस्यांना तांदळाचं वाटप
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत खाद्य आणि पुरवठा विभागाने रविवारपर्यंत उत्तर प्रदेशातील 31 लाख लाभार्थी कुटुंबातील 1.25 कोटी सदस्यांना 62695 मेट्रिक टन विनामूल्य तांदूळ वाटप केले. 15 एप्रिलपासून या योजनेंतर्गत 2.8 कोटी कार्डधारकांच्या कुटुंबातील 11.78 कोटी सदस्यांना 5.89 लाख मेट्रिक टन तांदूळ मोफत वाटण्यात आले. हे एकूण वितरण उद्देशाच्या 83 टक्के आहे. त्याचबरोबर कोरोना संक्रमणाच्या प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन 2.29 लाख नवीन शिधापत्रिका तयार करण्यात आल्या आहेत. जेणेकरून मजूर आणि गरजू लोकांना रेशन मिळू शकेल.