ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र; कोरोनासाठी आवश्यक औषधं, उपकरणांवरून टॅक्स, ड्युटी हटवण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 14:14 IST2021-05-09T14:10:55+5:302021-05-09T14:14:08+5:30
Coronavirus West Bengal : रुग्णांच्या उपचारासाठी उपकरणं, औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची पंतप्रधान मोंदींकडे केली मागणी.

ममता बॅनर्जींचं मोदींना पत्र; कोरोनासाठी आवश्यक औषधं, उपकरणांवरून टॅक्स, ड्युटी हटवण्याची मागणी
सध्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य व्यवस्थेवरील सध्या ताणही वाढत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी आवश्यक असलेली उपकरणे आणि औषधांवरील सर्व प्रकारचे कर आणि सीमा शुल्कात सूट देण्याची मागणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रदेखील लिहिलं आहे. याशिवाय त्यांनी आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा अधिक बळतट करण्यासाठी आणि कोरोनाच्या रुग्णांच्या उपचारासाठी उपकरणे, औषधं आणि ऑक्सिजनचा पुरवठा वाढवण्याची मागणीही केली आहे.
"मोठ्या संख्येने संस्था, लोक ऑक्सिजन सिलिंडर, कंटेनर आणि कोरोना संबंधित औषधे दान करण्यासाठी पुढे आली आहेत. अनेक दान देणाऱ्यांनी यावर लागणारे सीमा शुल्क आणि जीएसटीवर सूट देण्यासाठी विचार करण्यासाठी राज्य सरकारदरबारी विनंती केली आहे," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. "यांच्या किंमती केंद्र सरकारच्या नियंत्रणाखाली येतात. च्यामुळे या सामानावर जीएसटी आणि सीमा शुल्क आणि अन्य शुल्कांमधून सूट देण्यात यावी. जेणेकरून कोरोना महासाथीच्या योग्य व्यवस्थापनासाठी जीवनावश्यक औषधं आणि उपकरणांचा पुरवठा वाढवणअयााठी मदत मिळेल," असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी पत्र लिहून केले होते आरोप
यापूर्वी शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु यानंतरही राज्याच्या हिस्स्याचा ऑक्सिजन केंद्र सरकार अन्य राज्यांना देत असल्याचा आरोप त्यांनी या पत्राद्वारे केला होता. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी पहिल्यांदा राज्यात १९ हजार २१६ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर दुसरीकडे कोरोनामुळे ११२ जणांचा मृत्यू झाला होता. हे एका दिवसातील सर्वाधिक संख्या होती.