CoronaVirus News: कोरोना जाणार नाही, त्याच्यासोबतच जगणं शिकावं लागेल, केजरीवालांनी सांगितला अॅक्शन प्लॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2020 09:58 PM2020-05-02T21:58:11+5:302020-05-02T22:08:04+5:30
नवी दिल्ली : लॉकडाउन हा कोरोना व्हायरसवरील पर्याय नाही. यामुळे कोरोनाचा केवळ प्रसार थांबेल. आम्ही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र ...
नवी दिल्ली : लॉकडाउन हा कोरोना व्हायरसवरील पर्याय नाही. यामुळे कोरोनाचा केवळ प्रसार थांबेल. आम्ही केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो, की त्यांनी वेळेत लॉकडाउनची घोषणा केली. या काळात आम्ही कोविड हेल्थ सेंटर तयार केले, पीपीई किट आणि टेस्ट किट जमवल्या. मात्र, आता आपल्याला कोरोनासोबतच जगायची सवय लावावी लागेल. आम्ही लोक पूर्णपणे तयार आहोत, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. ते एका वृत्त वाहिनीशी बोलत होते.
केजरीवालांनी सांगितला अॅक्शन प्लॅन -
यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपला अॅक्शन प्लॅनही सांगितला. यावेळी त्यांनी एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगितली. ते म्हणाले, लॉकडाउन केल्याने देश कोरोनामुक्त होणार नाही. आपण विचार करत असाल, की एखाद्या भागात लॉकडाउन केले, तर तेथील कोरोना बाधितांची संख्या शून्य होईल, तर असे जगात कुठेही होत नाहीये. आपण संपूर्ण दिल्लीलासुद्धा लॉकडाउन केले, तरी कोरोना केसेस संपणार नाहीत. लॉकडाउनमुळे कोरोना केवळ कमी होऊ शकतो.
हिंदूंनी आपले सण घरात साजरे केले, मग रमझानसाठी रस्त्यावर येण्याची सूट का?; राज ठाकरेंचा सवाल
कोरोनासोबतच जगावे लागेल -
केजरीवाल म्हणाले, आता अर्थव्यवस्था खुली करण्याची वेळ आली आहे. आता दिल्ली पूर्णपणे तयार आहे. लॉकडाउननंतर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली तरी त्यासाठी आपण तयार रहायला हवे. केंद्र सरकारने प्रत्येक राज्याला तयारी करायला सांगावी आणि हळू-हळू राज्यांतील लॉकडाउन हटवावे. जे रेड झोन आहेत केवळ तेच बंद ठेवायला हवेत. इतर भाग खुले करायला हवेत. अशात लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.
तीन कंटेनमेंट झोनमध्ये 60 टक्के मृत्यू -
मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, दिल्लीतील केवळ तीन कंटेनमेंट झोनमध्ये 60 टक्के मृत्यू झाले आहेत. मरकजमधून 3200 लोक काढण्यात आले. त्यापैकी 1100 लोक कोरोनाग्रस्त सापडले. 700 ते 800 परदेशातून आलेल्या लोकांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली. दिल्लीने बरेच कंट्रोल केले आहे.