CoronaVirus News : नातेवाईक जिथे डगमगतात, तिथे ‘ते’ पुढे सरसावतात; 200 हून अधिक व्यक्तींवर केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 04:40 PM2020-07-18T16:40:24+5:302020-07-18T16:57:20+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्ण सापडलेल्या कुटुंबांना वाळीत टाकण्याच्या विचित्र घटना या काळात समोर आल्या. अशावेळी फक्त माणुसकीच्या नात्यानं पुढे सरसावलेलेही कमी नव्हते. त्यात, दिल्लीतील शहीद भगतसिंग सेवा दलाचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.

CoronaVirus Marathi News Bhagat Singh Sewa Dal JitenderSingh Shunty stepsup COVID19 victims | CoronaVirus News : नातेवाईक जिथे डगमगतात, तिथे ‘ते’ पुढे सरसावतात; 200 हून अधिक व्यक्तींवर केले अंत्यसंस्कार

CoronaVirus News : नातेवाईक जिथे डगमगतात, तिथे ‘ते’ पुढे सरसावतात; 200 हून अधिक व्यक्तींवर केले अंत्यसंस्कार

googlenewsNext

नवी दिल्लीः आयुष्यात बरे-वाईट प्रसंग येतच असतात, त्यातून आपल्याला वेगवेगळे अनुभवही मिळतात. कोरोनाकाळ तर अनुभवांची खाणच ठरला आहे. कोरोना रुग्ण सापडलेल्या कुटुंबांना वाळीत टाकण्याच्या विचित्र घटना या काळात समोर आल्या. इतकंच नव्हे तर, कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईकही पुढे न आल्याचे खेदजनक प्रकार पाहायला मिळाले. अशावेळी, त्या व्यक्तीशी कुठलंही नातं नसताना, फक्त माणुसकीच्या नात्यानं पुढे सरसावलेलेही कमी नव्हते. त्यात, दिल्लीतील शहीद भगतसिंग सेवा दलाचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.

दिल्लीत 1995 मध्ये स्थापन झालेली शहीद भगत सिंग सेवा दल ही संस्था बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करते. कोरोना विषाणू, त्याचा संसर्ग आणि त्यामुळे होणारे मृत्यूही त्यांना रोखू शकले नाहीत. बेवारस मृतदेहांसोबतच कोरोनाच्या भीतीमुळे कुटुंबानं अव्हेरलेल्या 200 हून अधिक कोरोनाबळींच्या मृतदेहांवरही जितेंद्र सिंह शंटी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले. आमचा जीव गेला तरी चालेल पण आम्ही कोरोनारुग्णांची सेवा करत राहणार, असा निर्धारही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.

दिल्लीच्या निगमबोध घाटावर एकदा एक गरीब माणूस आपल्या लहान मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी तिथली आजूबाजूची अर्धवट जळालेल्या अवस्थेतील लाकडं उचलताना जितेंद्र सिंह शंटी यांनी पाहिलं आणि त्यांचं आयुष्यचं बदललं. कुणीही असहाय्य किंवा गरीब व्यक्ती अंत्यसंस्कारापासून वंचित राहणार नाही, असं वचन त्यांनी मित्रांना दिलं आणि शहीद भगत सिंग सेवा दलाची स्थापना केली.

आज या संस्थेकडे 18 अँब्युलन्स आहेत. ते कोरोनाग्रस्त मृतदेहांना रुग्णालयातून स्वतःच्या अँब्युलन्समधून नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करत आहेत. शहीद भगत सिंग यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण हे सेवा कार्य करत असल्याचं जितेंद्र सिंग शंटी म्हणाले. ३५ कुटुंबांनी त्यांच्या स्वतःच्या माणसांवर अंत्यसंस्कार करण्यास असहाय्यता दर्शवली. त्या मृतदेहांवरही आम्ही अंत्यसंस्कार केल्याचं त्यांनी सांगितलं.

कोरोनाग्रस्तांची सेवा आणि मृतांवर अंत्यसंस्कार करत असताना शंटी यांनी दोन मुलं आणि पत्नीसुद्धा कोरोनाबाधित झाली. पण तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी सेवा देणं थांबवलं नाही. त्यांची पत्नी आणि मुलं घरातच अलगीकरणात राहत असून, दुसरा मुलगा बरा झाल्यानंतर पुन्हा त्यांच्यासोबत कोरोनाग्रस्तांची सेवा करणार आहे. कोरोनाग्रस्त रुग्णाकडे समाज अन् प्रशासन एखाद्या दहशतवाद्यासारखं पाहत असल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. मात्र, नागरिकांनी ही भीती काढून टाकावी आणि कोरोनारुग्णांना, त्याच्या नातेवाईकांना माणुसकीनं वागवावं, असं आवाहन त्यांनी केलं. 

Disclaimer: ‘फेसबुकने या उपक्रमासाठी आमच्यासोबत भागीदारी केली आहे, मात्र या मजकुरावर त्यांचं कुठलंही संपादकीय नियंत्रण अथवा प्रभाव नाही.’

 

Web Title: CoronaVirus Marathi News Bhagat Singh Sewa Dal JitenderSingh Shunty stepsup COVID19 victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.