CoronaVirus News : आता कोरोनाची लढाई दुसऱ्या टप्प्यावर, गावा-गावात अन् घरा-घरात होणार तपासणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 06:25 PM2020-05-01T18:25:09+5:302020-05-01T18:34:20+5:30
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की 'आता लढाई चेन ऑफ ट्रांसमिशनला ब्लॉक करण्याची आहे. यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केले जातील. संभाव्य कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात जे आले आहेत, त्यांचा शोध घेतला जाईल.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसविरोधातील लढाई आता दुसऱ्या टप्प्यावर पोहोचली आहे. केंद्राने पुढील टप्प्यातील लढाईची रुपरेखाही तयार केली आहे. याचीच एक झलक आज पत्रकार परिषदेत बघायला मिळाली. या टप्प्यात छोटी शहरे आणि गावांमध्ये संभाव्य कोरोनाबाधितांची ओळख, त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचा शोध, तसेच त्यांच्यावरील उपचार, या सर्व गोष्टींची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना, आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, आता गावा-गावातील कंटेनमेंट झोन लक्षात घेतले जातील आणि विशेष चमू तयार करून घरा-घरात तपासणी केली जाईल.
आता छोटे-छोटे भागही कंटेंमेंट झोन म्हणून घोषित होणार -
आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की 'आता लढाई चेन ऑफ ट्रांसमिशनला ब्लॉक करण्याची आहे. यासाठी संपूर्ण शक्तीनिशी प्रयत्न केले जातील. संभाव्य कोरोनाबाधित आणि त्यांच्या संपर्कात जे आले आहेत त्यांचा शोध घेतला जाईल. कोरोनाबाधित कोण-कोणत्या भागात आहेत. याचे विष्लेशन केले जाईल. तसेच ज्या ठिकाणी रुग्ण आढळतील त्या ठिकानांना कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले जाईल. यात कुठलीही कॉलनी, मोहोल्ला, म्यूनिसिपल वॉर्ड, पोलीस ठाण्याची हद्द, अथवा संपूर्ण शहरही येऊ शकते.'
गावा-गावात अन् घरा-घरात शोध मोहीम -
गाव पातळीवरील तयारीचा खुलासा करताना अग्रवाल म्हणाले, 'ग्रामीण भागात एखादे गाव, काही गावांचा समूह अथवा पोलीस ठाण्याअंतर्गत येणारे भाग, तसेच ग्राम पंचायतीचे भाग, कंटेनमेंट झेन म्हणून घोषित करावे लागतील. याच बरबोर, प्रत्येक कंटेमेंट झोनमध्ये एक बफर झोनही तयार करावा लागेल. यामुळे संबंधित कावातील हालचालींवर लक्ष ठेवता येईल. या बफर झोनमध्ये सर्वप्रकारची व्यवस्था निश्चित केली जाईल.'
विशेष चमूच्या माध्यमातून पार पाडले जाईल काम -
अग्रवाल म्हणाले, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला प्रतिबंध घालण्यासाठी आणि संक्रमित लोकांना शोधण्यासाठी काही कठोर नियम लागू करावे लागतील. याचबरोबर विशेष चमूही तयार करावा लागेल, जो कंटेंमेंट झोनमध्ये घरा-घरात जाऊन तपासणी करेल. तसेच 'स्पेशल टीमने सर्वप्रकारच्या केसेसची सक्रियपणे तपासणी करावी. त्यांचा फोकस इन्फ्लुएंजासारखे आजार आणि श्वसनाशी संबंधित गंभीर आजारांवर (एसएआरआय) असावा. याची लक्षणे असणाऱ्या लोकांना शोधून त्यांची सॅम्पलींग केली जावी. सर्व कॉन्टैक्ट्स शोधले जावेत आणि नंतर त्यांचे क्लिनिकल मॅनेजमेंट केले जावे,' असेही अग्रवाल म्हणाले.
अशी आहे देशाची स्थिती -
केंद्रिय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात जवळपास 35,043 कोरोनाबाधित आहेत. त्यापैकी 25,007 जणांवर उपचार सुरू आहेत. तर 8,889 जण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 564 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 1,147 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.