CoronaVirus News: कोरोनाचा कहर वाढला; 'हे' 25 जिल्हे ठरतायत देशाची डोकेदुखी, महाराष्ट्रातील तब्बल 6 जिल्ह्यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2020 01:39 PM2020-05-25T13:39:07+5:302020-05-25T13:45:38+5:30
हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
नवी दिल्ली : देशात 18 मेपासून लॉकडाउन-4ला सुरूवात झाली आहे. यात देशात लागू करण्यात आलेले अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र, यानंतर देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होऊ लागली आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, तब्बल 25 शहरी जिल्हे देशाची डोकेदुखी वाढवत आहेत.
हे जिल्हे महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, तेलंगाणा आणि तमिळनाडू राज्यांतील आहेत. या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
जाणून घ्या; पॉझिटिव्ह रुग्णांपासून 'किती ते किती दिवसांपर्यंत' पसरतो कोरोना? संशोधनाचा मोठा दावा
पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 4.6 टक्क्यांवर -
भारतातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा दर 22 मेरोजी 4.6 टक्क्यांवर पोहोचला. यापूर्वी तो 4.2 ते 4.3 टक्क्यांच्या दरम्यान होता. या 25 जिल्यांमध्ये 16 मेरोजी पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचा दर 8 ते 41 टक्के होता. मात्र, 22 मेरोजी तो 11 ते 52 टक्क्यांवर पोहोचला आहे. यामुळे संपूर्ण देशातील दिवसाचा कोरोना पॉझिटिव्ह दर 16 मेपासून 22 मेदरम्यान 6 टक्क्यांच्या जवळपास राहिला. परिणामी देशाचा दर 4.6 टक्क्यांवर पोहोचला.
हे आहेत महाराष्ट्रातील 6 जिल्हे -
या 25 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, नाशिक, मुंबई सबअर्बन, पालघर आणि रायगड या 6 जिल्ह्यांचा समावेश आहे. मुंबई जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब म्हणजे, 22 मेरोजी येथील पॉझिटिव्ह दर 31 टक्के होता. जो, 16 मेरोजी 41 टक्के होता. पालघर जिल्ह्यातील पॉझिटिव्ह दर 22 मरोजी वाढून 42 टक्के झाला आहे. नाशकात तो 5 टक्के, तर रायगडमध्ये 13 टक्के आहे. देशात सर्वाधिक कोरोना बाधित मुंबईमध्ये आहेत. येथे एकूण 27,000 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
महाराष्ट्र वगळता इतर राज्यांतील जिल्हे -
देशाची डोकेदुखी ठरलेल्या या 25 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र वगळता, राजधानी दिल्लीतील सर्व 10 जिल्हे, गुजरातमधील अहमदाबाद आणि वडोदरा, तामिळनाडूतील चेन्नई, तेलंगाणातील हैदराबाद, पश्चिम बंगालमधील हावडा, तर मध्य प्रदेशातील इंदूर, उज्जैन, मंदसौर आणि बुरहानपूर या जिल्ह्यांचा समावेश आहेत.
CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही"