CoronaVirus News: देशातील या 'तीन' राज्यांत कोरोनाची दुसरी लाट; दसरा, दिवाळीत घालणार थैमान - तज्ज्ञांचा इशारा
By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 1, 2020 10:03 AM2020-10-01T10:03:04+5:302020-10-01T10:06:26+5:30
Covid-19 : येणाऱ्या सणासुदीच्या काळात अडचणीत अधिक वाढ होण्यची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ वर्तवित आहेत. तसेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसपासून अधिक सतर्क राहण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.
नवी दिल्ली - देशात आजपासून अनलॉक-5ला (Unlock-5) सुरुवात झाली आहे. यावेळी चित्रपट गृहांना 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यातच केरळ आणि पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण आढळत असल्याने टेंशन वाढले आहे. एवढेच नाही, तर हा कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका आसून येणाऱ्या सणासुदीच्या काळात अडचणीत अधिक वाढ होण्यची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञ वर्तवित आहेत. तसेच हिवाळ्यात कोरोना व्हायरसपासून अधिक सतर्क राहण्याचा सल्लाही तज्ज्ञ देत आहेत.
दिल्लीत जूनमध्ये वाढले होते सर्वाधिक रुग्ण -
राजधानी दिल्ली आणि केरळमध्ये नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्याचे बघायला मिळत आहे. दिल्लीत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण जूनमध्ये आढळले. तेव्हा साधारणपणे रोज सरासरी 3000 नवे रुग्ण सापडत होते. यानंतर जुलैच्या सुरुवातीला आणि शेवटी रुग्णांची संख्या रोज कमी होताना दिसत होती. या दरम्यान दिल्लीत रोज जवळपास 1,000 रुग्ण आढळत होते.
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये दुसरी लाट?
जुलैनंतर ऑगस्ट महिन्याच्या मध्यात दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढू लागली आणि 9 सप्टेंबरला दिल्लीत 4,039 नवे रुग्ण आढळले होते. राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या आता 2.5 लाखवर पोहोचली आहे. बुधवारी दिल्लीत 3,827 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी म्हटले आहे, 'आम्हाला दिल्ली, पंजाब आणि केरळमध्ये कोरोनाची दुसरी लाट दिसत आहे.'
केरळही वाढवतोय टेंशन -
केरळमध्येही कोरोनाच्या नव्या रुग्णांत वाढ होताना दिसत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांत येथे घट दिसून आली. मात्र, 16 ते 22 सप्टेंबरदरम्यान येथे पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होताना दिसून आली. 23 ते 29 सप्टेंबरच्या आठवड्यात राज्यात 5,898 नवे रुग्ण समोर आले.
'या' चार राज्यांतून येतेय गुड न्यूज -
आतापर्यंत कोरोनाची प्रचंड दहशत असलेली मोठी राज्ये, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर घट होताना दिसत आहे. या शिवाय इतरही काही राज्यांत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.
पंजाबात पाच शहरं वाढवतायत टेंशन -
पंजाबमध्ये मंगळवारी 16,824 एवढे सक्रिय कोरोना रुग्ण होते. राज्यातील 5 शहरे लुधियाना, जालंधर, मोहाली, अमृतसर आणि पटियाला येथे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत पंजाबात 3,359 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मंगळवारी राज्यात 1,100 नवे रुग्ण समोर आले होते. तर येथील रुग्णांचा एकून आकडा आता 1,12,460वर पोहोचला आहे.