CoronaVirus News : "...तर कोरोनाऐवजी लॉकडाऊनमुळे जास्त लोकांचा मृत्यू होईल"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 01:27 PM2020-04-30T13:27:51+5:302020-04-30T13:34:48+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला आहे तर 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मुर्ती यांनी लॉकडाऊनवर चिंता व्यक्त केली आहे.
नवी दिल्ली - भारतासह अनेक देशांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. मात्र त्यानंतर देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 33 हजारांवर गेला आहे तर 1000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मुर्ती यांनी लॉकडाऊनवर चिंता व्यक्त केली आहे.
लॉकडाऊन पुढेही सुरू राहिल्यास कोरोनामुळे नाही तर उपासमारीमुळे भारतात जास्त लोकांचा मृत्यू होईल अशी भीती नारायण मुर्ती यांनी व्यक्त केली आहे. 'कोरोनाला आता आपण स्वीकारायला हवं आणि लोकांना कामावर येण्यास परवानगी द्यायला हवी. मात्र त्याचवेळी याचा संसर्ग होण्याची सर्वाधिक शक्यता असणाऱ्यांची काळजी घ्यायला हवी. एका मर्यादेनंतर कोरोना व्हायरसपेक्षा उपासमारीमुळे होणारे मृत्यू हे अधिक असतील. त्यामुळे भारत लॉकडाऊनचा कालावधी अधिक काळ सुरू ठेवू शकत नाही हे समजून घेणं आपल्यासाठी महत्त्वाचं आहे' असं मत त्यांनी मांडलं आहे.
नारायण मुर्ती यांनी 'कोरोनाच्या एकूण रुग्णसंख्येकडे पाहिलं तर भारतातील मृत्यूदर हा 0.25 ते 0.5 टक्क्यांच्या दरम्यान आहे. इतर विकसनशील देशांच्या तुलनेत हा मृत्यूदर कमी फार कमी आहे. भारतात विविध कारणांमुळे दरवर्षी 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. भारत हा जगातील सर्वात जास्त प्रदूषण असलेल्या देशांपैकी एक आहे. दरवर्षी होणाऱ्या मृत्यूपैकी एक चतुर्थांश मृत्यू हे प्रदुषणामुळे होत असतात. गेल्या दोन महिन्यांत 1 हजार जणांचा मृत्यू झाला आहे आणि जर दरवर्षी 9 दशलक्ष लोकांचा मृत्यू हा नैसर्गिकरित्या होत असेल तर ही घाबरण्यासारखी स्थिती आहे असं म्हणता येणार नाही' असं म्हटलं आहे.
'भारतात तब्बल 190 दशलक्ष लोक असंघटीत क्षेत्रात काम करत आहेत किंवा त्यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. लॉकडाऊनमुळे यापैकी काहींनी आपलं काम गमावलं आहे. यापुढेही लॉकडाऊन मोठ्या कालावधीसाठी सुरू राहिला तर आणखी लोकांना आपलं काम गमवावं लागेल' अशी भीतीही नारायण मुर्ती यांनी व्यक्त केली आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 218,187 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,147,623 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 961,871 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Rishi Kapoor passed away : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन, बॉलिवूड शोकमग्न
Rishi Kapoor passed away: ऋषी कपूर म्हणजे गुणवत्तेचा खजिना; पंतप्रधानांनी वाहिली श्रद्धांजली