CoronaVirus News: ...तर १० दिवसांमध्येच कोरोना रुग्णाला डिस्चार्ज; होम क्वारंटिनच्या नियमातही मोठा बदल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2020 11:51 AM2020-05-09T11:51:54+5:302020-05-09T12:17:50+5:30
CoronaVirus Marathi News: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून नव्या नियमांची माहिती
नवी दिल्ली: कोरोना रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देताना पाळण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून शनिवारी सकाळी याबद्दलची माहिती देण्यात आली. नव्या नियमांनुसार एखाद्या रुग्णामध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नसल्यास आणि त्याची प्रकृती स्थिर असल्यास १० दिवसांमध्येही त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. डिस्चार्जनंतर रुग्णाला १४ दिवसांऐवजी ७ दिवस घरात क्वारंटिन करण्यात येईल. चौदाव्या दिवशी टेलि-कॉन्फरन्सच्या माध्यमातून रुग्णाची माहिती घेतली जाईल.
कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसत नसलेल्या किंवा अतिशय सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना कोविड केयरमध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या शरीराचं तापमान आणि हृदयाचे ठोके दररोज तपासले जातील. तीन दिवस ताप नसल्यास १० दिवसांनंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. त्यावेळी त्यांची चाचणी घेण्यात येणार नाही. डिस्चार्जनंतर रुग्णाला ७ दिवस होम क्वारंटिन राहण्याच्या सूचना देण्यात येतील. डिस्चार्जच्या आधी ऑक्सिजन सॅच्युरेशन ९५ टक्क्यांच्या खाली आल्यास रुग्णाला डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये (सीडीसी) ठेवण्यात येईल.
कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्या रुग्णांना डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये ऑक्सिजन बेड्सवर ठेवलं जाईल. त्यांच्या शरीराचं तापमान आणि ऑक्सिजन सॅच्युरेशनचं प्रमाण नियमित तपासलं जाईल. रुग्णाचा ताप ३ दिवसांत उतरल्यास आणि त्याच्या शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक असल्यास १० दिवसांत डिस्चार्ज देण्यात येईल. त्यावेळी रुग्णाला ताप, खोकला नाही ना, याची तपासणी केली जाईल. ताप, खोकला, ऑक्सिजनची गरज नसलेल्या रुग्णाची डिस्चार्ज देताना कोणतीही चाचणी केली जाणार नाही.