CoronaVirus धक्कादायक! योगी आदित्यनाथांना क्वारंटाईन तरुण भेटला; उत्तर प्रदेशात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 04:57 PM2020-05-06T16:57:27+5:302020-05-06T16:59:33+5:30
आदित्यनाथ यांच्या कार्यालयात सात दिवसांपूर्वी उन्नावहून काही लोक आले होते. त्यांनी मदतीचा चेक सुपूर्द केला. त्यांच्यासोबत हा क्वारंटाईन केलेला तरुणही होता.
लखनऊ : कोरोना व्हायरसविरोधात लढण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे झटत आहेत. लॉकडाऊनचा नियम मोडेल आणि वेगळा पायंडा पडेल म्हणून त्यांनी वडिलांच्या अंत्यविधीलाही जाण्याचे टाळले होते. मात्र, त्यांच्या सुरक्षेबाबत काळजी घेतली जात नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कोविड फंडामध्ये मदत देण्यासाठी आलेल्यांमध्ये एक क्वारंटाईन केलेला तरुणही होता. यामुळे प्रशासनाचे आता धाबे दणाणले आहेत.
आदित्यनाथ यांच्या कार्यालयात सात दिवसांपूर्वी उन्नावहून काही लोक आले होते. त्यांनी मदतीचा चेक सुपूर्द केला. त्यांच्यासोबत हा क्वारंटाईन केलेला तरुणही होता. उन्नावच्या बांगरमऊ क्षेत्रातील ब्योली इस्लामाबादमध्ये एक तरुण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्याच्या संपर्कात हा तरुण आल्याने त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. या प्रकाराची माहिती मिळताच अधिकारी आणि प्रशासनामध्ये खळबळ उडाली होती. जिल्हाधिकारी रविंद्र कुमार यांनी सीएमओशी संपर्क साधून हा तरुण कधी आणि कोणा कोणाला भेटला याची माहिती देण्यास सांगितले आहे.
हा तरुण कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. यानंतर बांगरमाऊ तहसील प्रशासनाने त्याला क्वारंटाईन केले. एका न्यूज चॅनेलचा रिपोर्टर असल्याचे या तरुणाने सांगितले. तसेच ३० एप्रिलला तो मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही भेटल्याचे समजले. तेथील भाजपाच्या पदाधिकाऱ्याने ११ लाख रुपयांचा चेक योगींकडे सोपविला होता. यावेळी हा तरुण त्यांच्या उजव्या बाजुला उभा होता.
मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकारी आशुतोष कुमार यांनी सांगितले की, कोरोना बाधित झालेल्या तरुणाच्या संपर्कात आलेल्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे एवढे घाबरायचे कारण नाही. तरीही सर्वांची तपासणी केली जाईल. भाजपाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की तो तरुण कोरोना बाधिताच्या संपर्कात असल्याचे माहिती नव्हते. तसेच त्याला क्वारटाईन केल्याचेही माहिती नव्हते. मात्र, सोशल डिस्टन्सिंग पाळत आम्ही चेक मुख्यमंत्र्यांना दिला आहे.