CoronaVirus News: अन् ५०० रुपयांच्या नोटा फेकून ते धूम पळाले, गावात उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2020 06:26 PM2020-05-03T18:26:02+5:302020-05-03T18:26:29+5:30
याप्रकरणी एसएचओ देवी यांनी सांगितले की, या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
हरियाणा - जगभरात कहर माजवणाऱ्या कोरोनाची दहशत आता गावापर्यंत पोहोचली आहे. सुरुवातीला सोशल मीडियावरील टिंगलटवाळीचा विषय बनलेला कोराना आता प्रत्येकजण गांभिर्याने घेत आहे. मात्र, कोरोनाबद्दल काही गैरसमज आणि अफवाही मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत. त्यामुळे, नागरिकांकडून कुठलीही रिस्क घेण्यात येत नाही. देशातील अनेक भागात नोटांद्वारे कोरोनाचा फैलाव करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे. हरयाणातील कैथल येथे काही लोकं आले अन् ५०० रुपयांच्या नोटा फेकून पळाले. या घटनेने गावांत खळबळ उडाली आहे.
कैथलमधी वर्ण विहार परिसरातील एका झोपडपट्टी भागात शनिवारी रात्री ही घटना घडली आहे. नोटा फेकून धूम ठोकल्याचे समजल्यानंतर या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. याबाबत माहिती मिळताच, स्थानिक पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली. त्यावेळी, या फेकून दिलेल्या नोटांची किंमत जवळपास १५ हजार रुपये एवढी आढळली. स्थानिक नागरिकांनी कुणीही या नोटांना हात लावला नाही, याउलट या नोटांवर वीटा ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणी एसएचओ देवी यांनी सांगितले की, या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. तसेच, या नोटांना सॅनिटाईज केल्यानंतर त्या नोटा उचलण्यात आल्या. कोरोनाच्या भीतीमुळे कुणीही नोटा उचलण्याची हिंमत केली नाही, असेही देवी यांनी सांगतिले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गुरुग्राम जिल्ह्याच्या पटौदीतील गाव बलेवा येथे रस्त्यावर पडलेल्या पैशांमुळे गावात खळबळ माजली. बलेवा गावात चक्क रस्त्यावार ५००० रुपये पडले होते, त्यामध्ये १० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या नोटांचा समावेश होता. मात्र, या नोटांना हात लावायची किंवा खिशात घालायची हिंमतही कुणी केली नाही. देशात असलेल्या कोरोनाच्या संकटामुळेच नागरिकांमध्ये नोटा उचलण्यासाठी भीती दिसून आली. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन या नोटा हस्तगत केल्या.
देशात कोरानाचे संक्रमण जाणीपूर्वक पसरविण्यात येत असल्याची चर्चा आणि अफवाही पसरत आहेत. त्यामुळेच, बलेगा गावात या नोटा उचलण्यासाठी कुणीही पुढे आले नाही. दरम्यान, पटौदी येथे कोरोनाचे काही रुग्ण आढळून आले आहेत. तसेच, पटौदी येथील तीन परिसरांना कंटनेमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. सध्या पोलिसांनी या नोटा हस्तगत केल्या असून खरंच हे पैसे जाणीवपूर्वक रस्त्यावर फेकले होते का, याचा तपास पोलीस करत आहेत.