CoronaVirus News: जूनमध्ये कोरोना हाहाकार माजवणार? आरोग्य मंत्रालयाने दिले 'असे' उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 08:03 PM2020-05-08T20:03:26+5:302020-05-08T20:09:52+5:30
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.'
नवी दिल्ली - मे महिना सुरू झाल्यापासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखी झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि दिल्लीमध्ये वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे चिंता अधिक वाढली आहे. यासंदर्भात दिल्ली एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी नुकताच दावा केला, की जूनमध्ये भारतातील कोरोना रुग्णांची संख्येत फार मोठ्या प्रमाणावर वाढ होईल. त्यांच्या या दाव्यानंतर आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने उत्तर दिले आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिले असे उत्तर -
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल म्हणाले, जर आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगली आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले, तर कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्यापासून आपण रोखू शकतो. मात्र, आपण आवश्यक ती सावधगिरी बाळगली नाही आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन केले नाही, तर कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढू शकते.
आणखी वाचा - CoronaVirus News : 'या' 6 व्हॅक्सीन मानवासाठी ठरू शकतात वरदान, कोरोनाच्या विळख्यातून करू शकतात जगाची सुटका
काय म्हणाले होते रणदीप गुलेरिया -
एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हणाले होते, 'सध्याचा ट्रेंड पाहता कोरोनाचे रुग्ण जून महिन्यात आपल्या सर्वोच्च पातळीवर असतील. मात्र हा आजार झटपट संपून जाईल असे नाही. आपल्याला कोरोनासोबतच राहावे लागेल. हळूहळू कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होऊ लागेल.'
'आपल्याला लॉकडाऊनचा निश्चितपणे फायदा मिळाला आहे. लॉकडाऊनमुळे आपल्या देशात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झालेला नाही. इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत कमी प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. रुग्णालयांनी लॉकडाऊनदरम्यान पुरेशी तयारी करून ठेवली आहे. डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच पीपीई किट्स, व्हेंटिलेटर्स आणि वैद्यकीय उपकरणांची सोय करण्यात आली आहे,' असेही गुलेरिया म्हणाले होते.
आणखी वाचा - LockdownNews : इम्रान सरकारचं मोठं पाऊल; लॉकडाउन हटविण्याचा घेतला निर्णय, 'असं' सांगितलं कारण
24 तासांत देशात 3390 नवे रुग्ण -
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशभरात एकूण 3390 नवे कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर 1273 रुग्ण बरे झाले आहेत. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या 56,342 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 1800 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,916 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 16,540 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जवळपास 29.36 टक्के लोकांनी कोरोनावर मात केली आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडा, गर्दीच्या ठिकाणीही जाणे टाळा. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने नागरिकांना केले आहे.
आणखी वाचा - CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनानं आतापर्यंत बदललीयेत शेकडो रुपं, वैज्ञानिकांचे हात अद्यापही रिकामेच