CoronaVirus: सौदी अरेबियात अडकले मराठी तरुण; दूतावासाकडून दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 12:57 AM2020-04-21T00:57:09+5:302020-04-21T00:57:23+5:30
सौदी अरेबियात अडकलेल्या या दोन मराठी तरुणांसह इतर दोन राज्यांतील तीन तरुणांचाही समावेश आहे.
नवी दिल्ली : नोकरीसाठी गेल्या वर्षी सौदी अरेबिया येथे गेलेले दोन मराठी तरुण अडकले आहेत. कंपनीने त्यांना दोन महिन्यांचे वेतनही दिले नसून भारतीय दूतावासाकडूनही मदत मिळत नसल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले आहे.
सौदी अरेबियात अडकलेल्या या दोन मराठी तरुणांसह इतर दोन राज्यांतील तीन तरुणांचाही समावेश आहे. प्रवीण कदम (पुणे), चिरंजीव गुप्ता (मुंबई), रक्षपाल सिंह (हरयाणा), अँथनी जोसेफ (केरळ), सेतू कृष्णा (केरळ) अशी या तरुणांची नावे आहेत.
मूळचे पुण्याचे असलेले प्रवीण कदम यांनी व्यथा मांडल्या आहेत. ते म्हणाले की, गेल्या वर्षी एप्रिलमध्ये आम्ही पाच जण येथे आलो होता. कोरोनामुळे दोन महिन्यांपासून येथे लॉकडाऊन आहे. कंपनीकडून दोन वेळचे जेवण मिळते; पण वेतन दिलेले नाही. भारतीय दूतावासाला घरी जाण्यासाठी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र, त्यांच्याकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही.
कदम म्हणाले की, आमच्या कंपनीत अनेक देशांतून आलेले तरुण नोकरीला आहेत. फिलिपीन्सच्या दूतावासाने या कर्मचाऱ्यांना चार महिने पगारी सुटी देणार असल्याचे सांगितले आहे. कंपनीने आम्हाला घरी जाण्याची परवानगी दिली आहे. विमानसेवा सुरू झाल्यावर आम्हाला घरी पाठवण्यात येणार आहे. मात्र, आमच्या रखडलेल्या वेतनाबाबत कोणताही खुलासा केलेला नाही.
नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न
भारतातील खासदार, मंत्री यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत आहोत. आम्हाला तातडीने भारतात येण्याची व्यवस्था करावी, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.