मार्च एंडिंगची वाट लागणार? पुढील आठवड्यात चार दिवस बँका बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:39 PM2020-03-17T17:39:46+5:302020-03-17T17:40:53+5:30
कोरोनामुळे जर सरकारी कार्यालयांप्रमाणे बँका बंद राहिल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
मुंबई : यंदाचे आर्थिक वर्ष संपायला काही दिवसच शिल्लक राहिले असताना कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशभरात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 126 हून अधिक जणांना बाधा झालेली आहे. यामुळे सरकारी कार्यालयेही बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
कोरोनाच्या प्रसाराला अटकाव करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार पाऊले उचलत असताना या बंदचा परिणाम सरकारी, खासगी कामांबरोबरच आता बँकेच्या कामांवरही होणार आहे. बँकांच्या संघटनांनी 27 मार्चला देशव्यापी संपाची हाक दिली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन (AIBEA) आणि ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) या दोन संघटनांनी ऐन मार्चच्या शेवटीच संप पुकारल्यामुळे कामे खोळंबणार आहेत.
पुढील आठवड्यात सोमवार आणि मंगळवारी बँका सुरू असणार आहेत. त्यानंतर 25 मार्चला बुधवारी गुढी पाडवा आणि अन्य सणांमुळे बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, जम्मू, मुंबई, नागपूर, गोवा येथील बँका बंद राहणार आहेत. पुढील दिवस गुरुवारी बँका पुन्हा सुरु राहतील. मात्र, 27 तारखेला संप पुकारल्यामुळे बँकांचे काम प्रभावित होण्याची शक्यता आहे. तर 28 मार्चला चौथा शनिवार असल्याने सुटी असणार आहे. आणि 29 मार्चला रविवार आहे. अशाप्रकारे पुढील आठवड्यात 4 दिवस बँका बंद राहणार आहेत.
त्यातच कोरोनामुळे जर सरकारी कार्यालयांप्रमाणे बँका बंद राहिल्यास मोठी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. 11 मार्चलाही संपाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, हा संप मागे घेण्यात आला होता. आता पुन्हा केंद्र सरकारने 10 बँकांच्या विलिनीकरणाला मंजुरी दिल्याने त्याविरोधात संप पुकारण्यात आला आहे. मार्च एन्डिंगमुळे कंपन्यांना कर्मचाऱ्यांचे पगारही शेवटच्या आठवड्यात करावे लागणार आहेत.