Coronavirus: मास्क, सोशल डिस्टेंसिंग अन् लॉकडाऊन...; भारतात पुन्हा परतणार हे दिवस?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 07:51 AM2022-12-22T07:51:15+5:302022-12-22T07:56:03+5:30
BF.7 व्हेरिएंट सर्वाधिक संक्रमिक पसरवणारा आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरतोय.
नवी दिल्ली - चीनमध्ये वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुन्हा एकदा भयावह परिस्थिती समोर आली आहे. याठिकाणी हॉस्पिटल, स्मशानभूमीमध्ये लोकांच्या रांगा लागल्या आहेत. यात भारतीयांना २०२०-२१ ची आठवण येत आहे. भारतातील लोक त्यादिवसाच्या कटू आठवणी पुन्हा नको याच मनस्थितीत आहेत. रस्त्यावर चालणारे मजूर, प्रत्येक गोष्टीला हात लावण्यापासून वाटणारी भीती, अफवा, हॉस्पिटलमधील जीवन मृत्यूचा संघर्ष हे अनुभव अंगावर काटे आणणारे आहेत.
२०२०-२१ या काळातील भारतातील कोरोना स्थिती कदाचितच कुणी विसरू शकेल. मास्क जगण्याचा एक भाग बनला होता. सोशल डिस्टेंसिंगमुळे एकत्र येणे टाळत होते. लाखो कर्मचारी ऑफिस सोडून स्वत:च्या घरातून काम करत होते. महिनोमहिने लॉकडाऊन लागला होता. घरातून बाहेर निघणेही मुश्किल झालं होते. त्यामुळे पुन्हा असे दिवस कुणालाच नको.
परंतु इच्छा नसली तरी चीन पुन्हा तेच दिवस पाहायला मिळत आहेत. चीनच्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी झाली आहे. औषधांचा तुटवडा दिसून येतोय. अनेक शहरांमध्ये निर्बंध लागले आहेत. लोक उपचारासाठी बाहेर जात आहेत. चीनची ही अवस्था पाहून भारतदेखील सतर्क झाला आहे. पुन्हा ही स्थिती नको त्यासाठी मास्क घालणं गरजेचे झाले आहे. सोशल डिस्टेंसिंगचं पालन करायला हवं. विना टेस्टिंग आणि कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्राशिवाय बाहेर फिरायला नको. जर ही स्थिती भारतात आली तर देशात पुन्हा रस्त्यावर भयाण शांतता पाहायला मिळू शकते. त्याशिवाय वर्क फ्रॉम होम आणि लॉकडाऊनसारखं वातावरण बनू शकतं. पण सध्यातरी ही परिस्थिती येणार नाही अशी अपेक्षा आहे.
चीनमध्ये कोरोनाच्या BF.7 या व्हेरिएंटचा कहर पाहायला मिळतोय. त्याठिकाणी सोशल डिस्टेंसिगचं पालन पुन्हा सुरू झालं आहे. BF.7 व्हेरिएंट सर्वाधिक संक्रमिक पसरवणारा आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे वेगाने पसरतोय. त्यासाठी सोशल डिस्टेंसिंग पालन करणे गरजेचे झाले आहे. AIIMS चे माजी संचालक डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, तणावाची स्थिती नाही परंतु सतर्क राहणे आणि काळजी घेणे गरजेचे आहे. कोविड एप्रोपिएटचं पालन करायला हवं. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, बाहेर जाताना मास्क लावून जा. जर तुम्ही लग्नाला, कार्यक्रमाला, सिनेमा हॉल, ऑडिटोरियमसारख्या ठिकाणी सोशल डिस्टेंसिंग पालन करणे आवश्यक आहे. वृद्ध, आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यायला हवी असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत देशात कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली तर सरकार सार्वजनिक कार्यक्रम, रॅली, मोर्च्यात सहभागी होणाऱ्या लोकांच्या संख्येवर निर्बंध आणू शकतं. शहरांमध्ये गर्दी रोखण्यासाठी कलम १४४ लागू केला जाऊ शकतो. भारतात आतापर्यंत BF.7 चे ५ रुग्ण सापडलेत. ते रुग्ण यावर्षी जुलै, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आढळले आहेत. देशात लॉकडाऊनची स्थिती नाही. परंतु निर्बंध लावले जाऊ शकतात. कंन्टेंन्मेंट झोन बनवण्यावर जोर दिला जाऊ शकतो. कोरोना रुग्णसंख्या वाढल्यावर पुन्हा वर्क फ्रॉम होम करायला लावलं जाऊ शकतं.