Coronavirus: ७२ तासांत कोरोनामुळं कुटुंब उद्ध्वस्त; सासऱ्याची चिता शांत होईपर्यंत पतीलाही द्यावा लागला मुखाग्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 09:09 AM2021-06-06T09:09:11+5:302021-06-06T09:12:29+5:30
३ दिवसांत महिलेचा पती आणि सासऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरात एकटीच असलेल्या महिलेने पती आजारी असल्याकारणाने सासऱ्याच्या मृतदेहावर तिनेच अंत्यसंस्कार केले.
मेरठ – देशात कोरोनाची दुसरी लाट पसरल्यानंतर अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली आहे. कोरोनानं अख्खं कुटुंब उद्ध्वस्त केल्याच्या घटना वाचायला मिळाल्या आहेत. मेरठमध्ये अशीच ह्दयद्रावक घटना घडली आहे. जी ऐकून तुमचंही काळीज पिळवटून जाईल. या शहरात राहणारं ३ जणांचं कुटुंब अवघ्या ३ दिवसांत हादरलं आहे. पती, पत्नी आणि सासरे असं तिघांचे हसतं खेळतं कुटुंब होतं. सर्वजण आनंदात जीवन जगत होते. परंतु या कुटुंबावर कोरोनाचं ग्रहण लागलं.
३ दिवसांत महिलेचा पती आणि सासऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. घरात एकटीच असलेल्या महिलेने पती आजारी असल्याकारणाने सासऱ्याच्या मृतदेहावर तिनेच अंत्यसंस्कार केले. त्यानंतर घरी परतली असता पतीचाही जीव गेल्याची बातमी तिच्या कानावर पडली आणि तिला प्रचंड धक्का बसला. पतीच्या मृतदेहाला मुखाग्नी देताना ज्यांनी ही दृश्य पाहिली त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं. कोरोनानं हसत्याखेळत्या कुटुंबाला संपवलं. कुठे आईनं त्याच्या लाडक्या मुलाला गमावलं तर कुठे पतीनं पत्नीची आयुष्यभराची साथ सोडली. मेरठमध्ये एका कुटुंबावर कोरोनानं असा आघात केला की, ३ दिवसांत या कुटुंबाचं होत्याचं नव्हतं झालं.
कुटुंबाला कोरोनाची नजर लागली. सुरुवातीला महिलेच्या पतीला ताप आला आणि त्यानंतर सासरेही आजारी पडले. बघता बघता संपूर्ण कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह झालं. ३ दिवसांत पहिल्यांदा सासरे आणि त्यानंतर महिलेच्या पतीचा मृत्यू झाला. काळजावर दगड ठेवत महिलेनं सासऱ्याचे अंत्यसंस्कार केले कारण त्यावेळी पती व्हेंटिलेटरवर होता. परंतु सासऱ्यावर अंत्यसंस्कार करून घरी परतच नाही तोवर पतीच्या मृत्यूची बातमी कानावर पडली. त्यानंतर महिलेच्या पायाखालची जमीन सरकली. त्यातूनही धैर्याने तिने पतीवर अंत्यसंस्कार केले. ज्या कोणी महिलेला चितेला आग लावताना पाहिले त्यांचेही डोळे पाणावले.
मेरठच्या कंकरखेडा परिसरात राहणारं हे छोटं कुटुंब आनंदात जीवन जगत होतं. २०१९ मध्ये पूजा आणि मयांकचं लग्न झालं होतं. पती मयांक शिक्षक होते तर सासरे निवृत्त कर्मचारी होते. हे कुटुंब कोरोनाच्या जाळ्यात अडकलं. त्यानंतर ३ दिवसांत कुटुंबातील दोन पुरुष गमावल्यानं महिला एकटी पडली. पूजाच्या नातेवाईकांनी सांगितले की, या कुटुंबात केवळ तिघंच जण होते. ७२ तासांत एक कुटुंब उद्ध्वस्त झालं. देव करो अन् अशी वेळ कोणावरही येऊ नये अशीच प्रार्थना नातेवाईक करत आहेत.