coronavirus: स्थलांतरीत मजुरांसोबत ग्रामीण भागात पोहोचला कोरोना, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये बिघडले गणित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 11:15 AM2020-05-21T11:15:32+5:302020-05-21T11:24:15+5:30
कोरोना विषाणूची भीती आणि लॉकडाऊनमुळे बंद झालेली रोजीरोटी यामुळे लाखो मजूर गावांकडे धाव घेत आहेत. मात्र हे मजूर गावी जाताना आपल्यासोबत कोरोनाचा संसर्गही घेऊन जात आहेत की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
लखनौ/पाटणा/रांची - देशासमोरील गंभीर आव्हान बनलेल्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरू आहे. मात्र कोरोना विषाणूची भीती आणि लॉकडाऊनमुळे बंद झालेली रोजीरोटी यामुळे लाखो मजूर गावांकडे धाव घेत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांच्या ये जा करण्यावर निर्बंध घातले जावेत, अशी सूचन करण्यात आली होती. मात्र बेरोजगारी आणि उपासमारीमुळे मजूर मिळेल त्या साधनाने गावाकडे जात आहेत. काही तर हजारो किलोमीटर पायपीट करून गाव गाठत आहेत. मात्र हे मजूर गावी जाताना आपल्यासोबत कोरोनाचा संसर्गही घेऊन जात आहेत की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्याने मजूर कामगार वर्गामध्ये अस्वस्थता आहे. त्यातच १ मेपासून श्रमिक ट्रेन सुरू झाल्याने स्थलांतर वाढल्याने कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागातही दिसू लागला आहे. यापूर्वी जिथे कोरोनाचे रुग्ण आढळत नव्हते, अशा ठिकाणीही कोरोनाचा फैलाव होत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालेल्या राज्यांमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या राज्यांतील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५० हून कमी होती. तिथे आता दुपटीहून अधिक कोरोनाग्रस्त झाले आहेत.
उत्तर प्रदेशमधील बाराबंकी जिल्ह्याचा समावेश काही दिवसांपूर्वीपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. मात्र स्थलांतरीत मजूर आल्यानंतर येथील कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढली आहे. येथे कोरोनाचे ९५ नवे रुग्ण आढळले असून, त्यातील ४९ रुग्ण हे स्थलांतरित मजूर आहेत. जिल्ह्यात आला कोरोनाचे १२१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. खगडिया जिल्ह्यात बुधवारी कोरोनाचे १५ रुग्ण सापडले. हे सर्व रुग्ण प्रवासी मजूर आहेत. जिल्ह्यात सध्या ७० कोरोनाग्रस्त रुग्ण असून, पैकी ४१ स्थलांतरीत मजूर आहेत. तर झारखंडमधील गढवा जिल्ह्यात कोरोनाचे १८ नवे रुग्ण सापडले आहेत. या जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ झाली आहे. यातही स्थलांतरीत मजुरांचे प्रमाण लक्षणीय आहे.
संबंधित बातम्या
बेरोजगारीचा कहर, लाखांमध्ये पगार घेणाऱ्यांवर मनरेगा मजूर म्हणून काम करण्याची वेळ
रामजन्मभूमीचे सपाटीकरण करताना सापडले प्राचीन मंदिराचे अवशेष
कोरोनाच्या लसीबाबत अमेरिकेच्या लीक झालेल्या लष्करी कागदपत्रातून धक्कादायक खुलासा
रशियाने रोबोच्या मदतीने उडवले लढाऊ विमान, अमेरिकेसह इतर देशांवर केली कुरघोडी...
गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात सापडलेल्या कोरोनाच्या रुग्णांपैकी ७० रुग्ण हे स्थलांतरीत असल्याचे उत्तर प्रदेशच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. तर बिहारमध्ये १० मेपर्यंत कोरोनाचे ७०७ रुग्ण होते. मात्र आता येथील कोरोनाग्रस्तांचा आकडा १६०० वर पोहोचला आहे. तर झारखंडमध्ये बुधवारी कोरोनाचे ३३ रुग्ण सापडले. यापैकी सर्व रुग्ण हे स्थलांतरीत मजूर आहेत.