Coronavirus: लॉकडाऊनमुळे काम थांबलं, घर सोडलं अन् गावाकडे निघाला; पण वाटेतच अडकला, मग...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 03:13 PM2020-04-09T15:13:07+5:302020-04-09T15:14:36+5:30
सध्या सोशल मीडियात कानपूरमधील एक असा फोटो व्हायरल होत आहे. त्यात एक मजूर लॉकडाऊनमुळे पायपीट करुन घरी पोहचू शकला नाही
कानपूर – कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशभरात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्या आणि कारखान्यांना टाळे लागले. हजारो मजूर बेरोजगार होऊन घराच्या दिशेने पायपीट करु लागले. वाहतुकीची सोय नसल्याने अनेक किमी चालत प्रवास करु लागले. लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळातील काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले मजुरांचे हाल पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले.
सध्या सोशल मीडियात कानपूरमधील एक असा फोटो व्हायरल होत आहे. त्यात एक मजूर लॉकडाऊनमुळे पायपीट करुन घरी पोहचू शकला नाही पण त्याने गॅरेजच्या बाहेर उभी असणाऱ्या खटारा गाडीला आपलं घर बनवलं. हमीरपूर येथे राहणारा कल्लू नावाचा हा मजूर आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर काम मिळणं बंद झालं. त्यानंतर त्याने हमीरपूर या आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे सहकारी आधीच गावीच पोहचले होते. गावाकडे जाण्याच्या आशेने त्याने भाड्याचं घर सोडलं आणि घराकडे निघू लागला.
मात्र मजुराच्या नशिबाने त्याला साथ दिली नाही. कोणतंही वाहन न मिळाल्याने तो कानपूरच्या नौबस्ता परिसरात अडकला. यानंतर त्याच्यावर नौबस्ता परिसरातील बसंत विहार येथील एका गॅरेजबाहेर उभ्या असणाऱ्या खटारा गाडीत राहण्याची वेळ आली. लॉकडाऊनमुळे गॅरेजदेखील बंद असल्याने कोणीही त्यास विरोध केला नाही. मागील १४ दिवसांपासून तो याच वॅनमध्ये राहतो. आसपास राहणारे लोक त्याच्या जेवणाची व्यवस्था करतात. त्याचसोबत अत्यावश्यक वस्तूही त्याला दिल्या जातात. कल्लू स्वत: वॅनमध्ये एका कापडी पिशवीत त्याचे सामना ठेवतो.
कल्लूला दोन वेळचं जेवण मिळतं त्यात तो समाधानी आहे. मात्र त्याला घराकडची आठवण रोज येते. सध्या तो आजूबाजूच्या लोकांची काही महत्वाची कामं करुन दिवस काढत आहे. लॉकडाऊनमुळे त्याचं रोजचं जीवन ठप्प पडलं आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपून पुन्हा आयुष्याच्या पटरीवर तो चालेल असा विश्वास त्याला आहे. कल्लूसारखे अनेक मजूर सध्या वाटेतच अडकले आहेत. राज्य सरकारकडून अशा मजुरांच्या राहण्याची व्यवस्था केली जात आहे. पण घराकडची ओढ या लोकांना लागून राहिली आहे.