Coronavirus: दाहकता! ७ महिन्याच्या मुलीला घेऊन आठवडाभर चालायचंय; मजुरांची अवस्था पाहून काळजात धस्स होईल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 01:15 PM2020-03-27T13:15:32+5:302020-03-27T13:17:15+5:30
राजकुमार याचे घर हजारो किमी दूर बिहारच्या छपरा येथे आहे. त्याच्याकडे १ हजार रुपये आहेत. पुढील पगार मिळणार की नाही याबाबत खात्रीही नाही.
नवी दिल्ली – देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अनेक मालकांनी त्यांच्या मजुरांना कामबंद करण्याची सूचना दिली. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा लॉकडाऊन आवश्यक असला तरी त्याची दुसरी भीषण बाजू समोर येऊ लागली आहे. गुरुग्राममध्ये नोकरी करणाऱ्या राजकुमारसोबत हा अनुभव येत आहे. त्याच्या मालकाने त्याला घरी जायला सांगितल्यानंतर तो घरी जाण्यास निघाला.
राजकुमार याचे घर हजारो किमी दूर बिहारच्या छपरा येथे आहे. त्याच्याकडे १ हजार रुपये आहेत. पुढील पगार मिळणार की नाही याबाबत खात्रीही नाही. यातच गुरुग्रामला बसून काहीच होणार नाही. पण याठिकाणाहून जाण्याचंही साधन नाही. राजकुमारने पत्नी, तीन महिन्याचा मुलगी आणि ५८ वर्षीय आईला घेऊन बुधवारी सकाळी गावाकडे जाण्यासाठी पायपीट सुरु केली. त्याच्यासारखे हजारो लोक रस्त्यावरुन चालत त्यांच्या गावी जात आहेत. राजकुमार यांनी दिवसभरात दिल्लीत पार करुन ५० किमी अंतर गाठलं होतं. काही स्थानिकांच्या मदतीने त्यांना जेवणाची पाकीटं मिळाली. रस्त्यावर पायपीट करणारे लोक पुढे चालत असतात, कोणतीतरी गाडी मिळेल हीच अपेक्षा त्यांना असते.
दिल्लीच्या एनसीआरमधून अचानक निघालेल्या लोकांची ही गर्दी हायवेवर पाहायला मिळते. जे लोक गावाकडे जायला निघालेत. हे कारखान्यात काम करणारे मजूर आहेत. कंपन्या बंद पडल्याने एका क्षणात हे सगळे बेरोजगार झालेत. या लोकांचे गावाकडे पलायन करणं सरकारसाठीही चिंतेचा विषय बनलं आहे. लॉकडाऊनचा अर्थ लोकांना धोक्यात घालणं नसून लोकांची गर्दी रोखणं हे आहे.
बुधवारी संध्याकाळपर्यंत गाझियाबादला पोहचलेल्या राजकुमारने सांगितले की, लॉकडाऊनमुळे सगळं बंद झालं. कंपनी मालकाने घरी जाण्यास सांगितले. पण घराचं भाडं कसं देणार? गावाकडे परतण्याखेरीज माझ्याकडे काहीच इलाज नाही. सर्व पूर्वपदावर आल्यानंतर मालकाचा कॉल येईल तेव्हा परत जाईन असं तो म्हणाला. तर मनोज ठाकूर हा गाझियाबादच्या वैशालीमध्ये एका कारखान्यात काम करतो. आनंद विहार बस टर्मिनलमधून त्यांना बस न मिळाल्याने १० तास चालत ते दादरी येथे पोहचले. दुपारी ३ वाजता चालण्यास सुरुवात केली त्यानंतर रात्री १ वाजता दादरी येथे पोहचलो. माझ्याकडे जेवणाचं पाकीट आहे पण पाणी नाही. हायवेवर एकही दुकान नाही. मनोजला यूपीतल्या एटा जिल्ह्यातील घरी पोहचायचा आहे. अजूनही १६० किमी चालायचं आहे.
सात महिन्याच्या मुलीला घेऊन आठवडाभर चालण्याची तयारी
अजमेरच्या ओमप्रकाश कुशवाहा यांची सात महिन्याची मुलगी आहे. त्यांना वाटेत कोणतीही गाडी सापडली नाही तर त्यांना घरी पोहचण्यासाठी सुमारे आठवडाभर चालत जावे लागणार आहे. गुरुवारी अशा लोकांची गर्दी दिल्ली-जयपूर महामार्गावरुन आपापल्या घराकडे जात होती. सर्वांकडे सामना, लहान मुलं आहेत. बर्याच जणांची एकच तक्रार आहे लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी आधी सांगितलं का नाही? फरीदाबादपासून 550 कि.मी. अमेठीला चालत निघालेले प्रताप गुप्ता म्हणाले,आम्हाला जर पूर्वी माहित असते तर आम्हाला चालत जाण्याची गरज पडली नसती.