Coronavirus:...त्यांनी शाळेला दिले वंदे भारत एक्स्प्रेसचे रूप; क्वारंटाइनमध्ये आगळे श्रमदान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2020 07:00 AM2020-06-29T07:00:00+5:302020-06-29T07:42:02+5:30
या शाळेला वंदे भारत एक्स्प्रेसचे रूप द्यावे असे त्यांना सरपंचांकडून सांगण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय वेगाने धावणारी इंटरसिटी गाडी आहे. या एक्स्प्रेससारखीच या शाळेची इमारत दिसेल, अशा पद्धतीने तिला कृष्णा चौधरी व सोबत राहाणाऱ्यांनी रंगकाम केले.
भोपाळ : चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे अनेक देशांनी लॉकडाऊन केले, कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी बाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांना क्वारंटाईन करण्यात आले, १४ दिवसांच्या क्वारंटाईनमध्ये आपला वेळ घालवण्यासाठी काहींनी आपले छंद जोपासले, कोणी शाळांमध्ये साफसफाई केली तर कोणी आपल्या कलेच्या माध्यमातून रंगरंगोटीचं काम केले. मध्य प्रदेशच्या शाळेत क्वारंटाइनमध्ये राहणाऱ्यांनी वेळेचा सद्पयोग करत या शाळेला वंदे भारत एक्स्प्रेस गाडीसारखी रंगरंगोटी करून सुशोभित केले. ही घटना या राज्यातील सतना जिल्ह्यातल्या जिगनहाट गावात घडली आहे.
या क्वारंटाइन केंद्रामध्ये १४ दिवस राहिलेल्या कृष्णा चौधरी यांचा रंगकामाचा व्यवसाय आहे. जम्मू येथील त्यांची कंपनी लॉकडाऊनमुळे बंद ठेवण्यात आल्याने ते मोटरसायकलवरून प्रवास करून आपल्या गावी परतले. त्यानंतर त्यांना शाळेतील क्वारंटाइन केंद्रात ठेवण्यात आले. तिथे हाती खूप वेळ असायचा. हाताला काही काम नसल्याने कंटाळाही यायचा. त्यामुळे कृष्णा चौधरी व त्यांच्यासोबत क्वारंटाइनमध्ये राहात असलेल्यांनी गावच्या सरपंचांकडे शाळेला रंगरंगोटी करण्याविषयीचा प्रस्ताव दिला.
या शाळेला वंदे भारत एक्स्प्रेसचे रूप द्यावे असे त्यांना सरपंचांकडून सांगण्यात आले. वंदे भारत एक्स्प्रेस ही अतिशय वेगाने धावणारी इंटरसिटी गाडी आहे. या एक्स्प्रेससारखीच या शाळेची इमारत दिसेल, अशा पद्धतीने तिला कृष्णा चौधरी व सोबत राहाणाऱ्यांनी रंगकाम केले. शाळेचे नावही वंदे भारत एक्स्प्रेस स्कूल असेच ठेवण्यात आले. सुतार असलेले अशोक विश्वकर्मा हे देखील क्वारंटाइनमध्ये राहात होते. त्यांनीही शाळेमध्ये आवश्यक ते सुतारकाम करून दिले. सरपंच उमेश चतुर्वेदी यांनी सांगितले की, शाळेला रंगरंगोटी करण्याकरिता रंग व ब्रश आम्ही मागविले. क्वारंटाइन केंद्रामध्ये राहात असलेल्यांनी एकही पैसा न घेता रंगकाम करून दिले. तीन आठवड्यांच्या आत हे काम पूर्ण करण्यात आले.
आयोगाची स्थापना
जे स्थलांतरित मजूर १ मार्चनंतर मध्य प्रदेशमध्ये परतले आहेत, त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी एका आयोगाची स्थापना केली. असा आयोग स्थापन करणार असल्याची घोषणा सरकारने एक महिन्यापूर्वी केली होती. या आयोगाचा कालावधी दोन वर्षांचा असून त्याच्या अध्यक्ष व दोन सदस्यांची नावे लवकरच जाहीर करण्यात येतील.