Coronavirus: लॉकडाऊनचं पालन करणाऱ्या पोलिसांवर जमावाचा लाठीहल्ला; ३ पोलीस गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 09:47 AM2020-04-02T09:47:51+5:302020-04-02T09:52:30+5:30
लोकांची चौकशी करताना पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्सटेंबल गंभीररित्या जखमी झाले आहेत
मुजफ्फरनगर – कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव देशात रोखण्यासाठी २५ मार्चपासून संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी केला आहे. पंतप्रधान नरेंद मोदींनी याबाबत घोषणा करताना लोकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन केले आहे. लॉकडाऊनचं पालन करण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रदिवस काम करत आहेत. मात्र उत्तर प्रदेशात पोलिसांना लॉकडाऊनची अंमलबजावणी करणं जीवावर बेतलं.
लोकांची चौकशी करताना पोलिसांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक पोलीस उपनिरीक्षक आणि कॉन्सटेंबल गंभीररित्या जखमी झाले आहेत. ही घटना मुजफ्फरनगरच्या मोरना गावची आहे. याठिकाणी पोलीस निरीक्षक लेखराज सिंह आपल्या सहकाऱ्यांसोबत लॉकडाऊनचं पालन करण्याची जबाबदारी पार पाडत होते. त्यावेळी लोकप्रतिनिधी नाहर सिंह यांच्या घराबाहेर जमलेल्या लोकांना घरात जाण्यास सांगितले. लोकांनी पोलिसांना मज्जाव केला असताना पोलिसांनी कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला.
यानंतर पोलीस आणि लोकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे रुपांतर हाणामारीत झाले. जमावाने पोलिसांवर लाठीकाठ्याने हल्ला केला. यामध्ये पोलीस निरीक्षक, शिपाई रविकुमार आणि जितेंद्र गंभीररित्या जखमी झाले. या जखमी पोलिसांना मेरठच्या रुग्णालयात दाखल केले.
एसपी देहात नेपाल सिंह, सीओ भोपा राममोहन शर्मा आणि आसपासच्या पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी पोहचले. पोलिसांनी जमावातील लोकांना ताब्यात घेतलं. याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकारी राममोहन शर्मा यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. आरोपींना ताब्यात घेतलं आहे. घटनेचा गुन्हा नोंद झाल्यानंतर आरोपींना अटक केली जाईल असं ते म्हणाले.
उत्तर प्रदेशात लॉकडाऊन दरम्यान ही तिसरी घटना आहे. यापूर्वी संभल आणि सहारनपूर याठिकाणी पोलिसांना मारहाण झाल्याची घटना घडली होती. सहारनपूर येथील बेहट कोतवाली जमालपूर गावात लॉकडाऊनचं उल्लंघन करुन मस्जिदीत जमलेल्या लोकांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या हल्ल्यातील ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तर जखमी झालेल्या २ पोलिसांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.