CoronaVirus : कोरोनावर मात करण्यासाठी मोदी सरकारची 'टीम-११'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 08:50 AM2020-03-30T08:50:25+5:302020-03-30T08:51:37+5:30
CoronaVirus : आतापर्यंत देशात ११३९ लोक कोरोना बाधित झाले आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. देशात सुद्धा कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत देशात ११३९ लोक कोरोना बाधित झाले आहेत. तर यामुळे ३० जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाचा सामना करण्यासाठी ११ समितींची स्थापना केली आहे. या समितींची जबाबदारी कोरोनामुळे आलेल्या आपत्तीशी लढण्यासाठी तयारी करण्याची आहे.
गृह मंत्रालयामार्फत रविवारी या समित्यांची स्थापना करण्यात आली. या समित्यांमध्ये मोदी सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिली समिती मेडिकल इमर्जन्सी मॅनेजमेंट प्लॅनसाठी तयार करण्यात आली आहे. याची जबाबदारी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. पॉल यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. याशिवाय, दुसरी समिती हॉस्पिटल, आयसोलेशन आणि क्वारंटाइनची उपलब्धता आणि आजारावर देखरेख, टेस्टिंग आणि क्रिटिकल केअर ट्रेनिंगसाठी तयार करण्यात आली आहे. तसेच, मेडिकल उपकरणे, रुग्णांना जेवण आणि औषधांची सुविधा, प्रायव्हेट सेक्टर व एनजीओसोबत को-ऑर्डिनेशन आणि लॉकडाउनसंबंधी समित्या तयार करण्यात आल्या आहेत.
Ministry of Home Affairs constitutes 11 Empowered Groups, under Disaster Management Act 2005, for planning & ensuring implementation of #COVID19 response activities.@HMOIndia@NITIAayog#COVID2019india#IndiaFightsCoronapic.twitter.com/K93zKs4ZBb
— PIB India 🇮🇳 #StayHome #StaySafe (@PIB_India) March 29, 2020
जगात कोरोना रुग्णांची संख्या ७ लाखांकडे; मृतांचा आकडा वाढला
जगभरातील १९९ देशांमध्ये पसरलेल्या कोरोनाने आतापर्यंत ३२,२०० जणांचा बळी घेतला आहे. बाधित रुग्णांची संख्या ६ लाख ८५ हजारांवर म्हणजेच ७ लाखांच्या दिशेने पोहोचली आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे तब्बल १ लाख ४७ हजार रुग्ण बरे झाले आहेत. आज अखेर ५ लाख ६ हजार ५०० जणांवरती विविध देशांत उपचार सुरू आहेत.
अमेरिकेमध्ये कोरोनाच्या चाचण्या जोरात सुरू असून, तेथील रुग्णांची संख्या जवळपास सव्वालाखांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेत ८०० नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले. तसेच आतापर्यंत या आजाराने सुमारे २,२५० लोकांचा बळी गेला आहे.
इटलीमधील मृतांचा आकडा १० हजारांवर गेला असून, तेथे सुमारे ९३ हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्याखालोखाल स्पेनमध्ये जवळपास ७९ हजार एवढे बाधित रुग्ण आहेत. गंभीर बाब म्हणजे गेल्या २४ तासांत तेथे ५,५०० हून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मृतांचा आकडा ६,५२५ एवढा झाला आहे.
स्पेनच्या राजकन्येचेही कोरोनामुळे निधन झाल्याने संपूर्ण देशात भीतीचे वातावरण आहे. हीच स्थिती जर्मनीमध्ये आहे. कोरोनामुळे देशाचे काय होईल, या विवंचनेतून जर्मनीमधील एका मंत्र्याने आत्महत्या केली. तेथील रुग्णांची संख्या जवळपास ५९ हजार झाली असून, त्यामध्ये नवीन रुग्ण ५५० एवढे आहेत. आतापर्यंत जर्मनीत ४५५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटनमध्ये संख्या वाढली
फ्रान्स, ब्रिटन, नेदरलँड, बेल्जियम, या देशांमध्येही कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. फ्रान्समध्ये कोरोनाच्या बळींची संख्या २३०० वर गेली आहे तर ब्रिटनमध्ये १२०० हून अधिक आहे. या दोन देशांत मिळून कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५७ हजारांहून अधिक आहे. नेदरलँड आणि बेल्जियम या दोन्ही देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण प्रत्येकी ११ हजार आहेत. परंतु तेथे मृतांची संख्या तुलनेने खूप कमी आहे.