Coronavirus : लॉकडाऊनच्या काळात मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 'या' कामांना दिली सवलत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:39 AM2020-04-15T11:39:38+5:302020-04-15T11:41:05+5:30
शासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार खाण्यापिण्याचे पदार्थ आणि औषध बनवणाऱ्या कंपन्या सुरूच राहणार आहेत. तसेच ग्रामीण भारतातील सर्व कारखाने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविला आहे. परंतु लॉकडाऊन 2मध्ये सरकारने अनेक क्षेत्रांना सवलतीही दिल्या आहेत. शासनाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार खाण्यापिण्याचे पदार्थ आणि औषध बनवणाऱ्या कंपन्या सुरूच राहणार आहेत. तसेच ग्रामीण भारतातील सर्व कारखाने सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनरेगाच्या कामांनाही परवानगी देण्यात आली असून, त्याअंतर्गत सिंचन व जलसंधारणाला प्राधान्य देण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळातही सर्व आरोग्य सेवांसाठी 20 एप्रिलपासून सूट मिळणार आहे. शेतीशी संबंधित कामांनाही सूट देण्यात येणार असून, या आर्थिक सवलतींमध्ये आर्थिक संस्थांचादेखील समावेश असेल. बँका, एटीएम सुरूच राहतील, परंतु तिथेसुद्धा सामाजिक अंतर राखणे आवश्यक असेल.
लॉकडाऊनच्या काळात शेतकर्यांना सरकारनं दिल्या सवलती
- कृषी उत्पन्न खरेदी करण्यात व किमान आधारभूत किंमत ठरवणाऱ्या एजन्सींना सूट देण्यात आली आहे.
- कृषी उत्पन्न बाजार समिती संचलित मंडईंना सूट देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की, ऑपरेटिंग एमएसपी (किमान आधारभूत किंमत) यासह कृषी उत्पादनांच्या खरेदीत गुंतलेल्या सर्व एजन्सींना काम करण्याची परवानगी दिली जाईल.
- शेतकरी व शेतमजुरांनाही शेतात काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, कृषी उत्पन्न बाजार समित्यांद्वारे संचालित किंवा राज्य/केंद्रशासित प्रदेश सरकारच्या अधिसूचित (मंडी) मंडई चालविण्यास परवानगी दिली जाणार आहे. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, थेट राज्य/केंद्रशासित प्रदेश, सरकार किंवा उद्योग यांच्यामार्फत शेतकरी/ शेतक-यांच्या गटाकडून थेट विक्रीस परवानगी देण्यात आली आहे. राज्ये/केंद्रशासित प्रदेश ग्रामीण पातळीवर विकेंद्रित विपणन आणि खरेदीला प्रोत्साहन देऊ शकतात.
- लहान व सीमान्त शेतकर्यांना कृषी यंत्रसामग्री पुरविणारी कस्टम हायरिंग सेंटर सुरू राहणार
- खते, कीटकनाशके व बियाणे यांचे उत्पादन व पॅकेजिंग युनिट्ला सूट मिळणार आहे. कृषी यंत्रसामग्री, त्याचे सुटे भाग (पुरवठा साखळीसह) आणि दुरुस्तीची दुकाने खुली असतील. खते, कीटकनाशके आणि बियाण्याचे उत्पादन, वितरण आणि किरकोळ क्षेत्र देखील खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- पेरणी व कापणी यंत्रांना एका ठिकाणांहून दुसर्या ठिकाणी नेण्याची सवलत देण्यात आली आहे. पशुवैद्यकीय रुग्णालयेही उघडण्यास मुभा दिली आहे.
- नवीन मार्गदर्शक सूचनांमध्ये सिंचनाच्या आणि शेतीच्या उपकरणाच्या कापणी व पेरणीशी संबंधित यंत्रे (राज्यातील किंवा राज्याबाहेरील) हालचाली घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.