CoronaVirus: मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; सोनिया गांधी, प्रणव मुखर्जींसह बड्या नेत्यांना केला फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2020 04:17 PM2020-04-05T16:17:58+5:302020-04-05T16:19:15+5:30
या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक वर्गाला एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
नवी दिल्ली- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मोदी सरकारही सतर्क झालं आहे. कोरोनाला थोपवण्यासाठी पंतप्रधान शक्य तितकी महत्त्वाची पावलं उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या लढ्याला आणखी बळ देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याशी फोनवरून बातचीत केली आहे. त्याशिवाय त्यांनी विरोधी पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनाही फोन केला असून, त्यात सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांचासुद्धा समावेश आहे. या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वच राजकीय पक्ष आणि समाजातील प्रत्येक वर्गाला एकजूट करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याशी संवाद साधून परिस्थिती सांगितली आहे. त्याशिवाय त्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याशीसुद्धा चर्चा केली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासोबतही ते बोलले आहेत. यासंदर्भात पंतप्रधानांनी सोनिया गांधी, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव, तृणमूल कॉंग्रेस सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिजू जनता दल सुप्रीमो आणि ओडिशाचे सीएम नवीन पटनायक, द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन आणि तेलंगणाचे सीएम केसीआर यांच्याबरोबर बातचीत केली आहे. अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल यांनाही त्यांनी फोन केला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संभाषणादरम्यान पंतप्रधानांनी कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी उचललेल्या उपायांवर चर्चा केल्याचं समजतंय. तसेच या गंभीर विषयावर त्यांनी अन्य नेत्यांची मतंही जाणून घेतली आहेत. गेल्या महिन्यात पंतप्रधान मोदींनी कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. पण सोनिया गांधींसह अनेक कॉंग्रेस नेत्यांनी सरकारवर आरोप केला की, कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी न करता टाळेबंदी लागू केली गेली. तथापि, पीएम मोदी आणि सर्व भाजप नेते असे म्हणत आहेत की, कोरोना संक्रमण थांबविण्यास त्यांच्याकडे पर्याय नाही. या विषाणूपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे सामाजिक अंतर(सोशल डिस्टन्सिंग) असल्याचं मोदींनी वारंवार सांगितलं आहे.
शुक्रवारी एका व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विषाणूविरुद्ध खेळाडूंना लढण्यासाठी संकल्प, संयम, सकारात्मकता, आदर आणि सहकार्याचा मंत्र दिला. पंतप्रधान मोदींसोबत या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये भाग घेतलेल्या खेळाडूंच्या यादीत अनेक नामांकित क्रिकेटपटूंचा समावेश आहे. सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि विराट कोहली व्यतिरिक्त विश्वचषक जिंकणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, माजी वेगवान गोलंदाज झहीर खान, युवराज सिंग आणि के. एल. राहुल यांच्याही नावांचा समावेश आहे.