CoronaVirus News: कोरोना लसीच्या खरेदी, वितरणासाठी तज्ज्ञांची समिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2020 03:04 AM2020-08-09T03:04:26+5:302020-08-09T03:04:54+5:30
केंद्र सरकारचे पाऊल; अब्जावधी रुपयांच्या निधीची करणार तरतूद
नवी दिल्ली : कोणती कोरोना प्रतिबंधक लस विकत घ्यावी इथपासून ते तिच्या वितरणापर्यंत सर्व महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारने तज्ज्ञांच्या एका समितीची स्थापना केली आहे. जगभरात सहा कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांचा तिसरा किंवा दुसरा-तिसरा, अशा एकत्रित टप्प्यातील प्रयोग सध्या सुरू आहेत. त्यातून ज्यांचे उत्तम निष्कर्ष येतील, त्यापैकी एका लसीची निवड करावी लागणार आहे.
या समितीच्या अध्यक्षपदी नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल आहेत. समितीच्या सहअध्यक्षपदी केंद्रीय आरोग्य खात्याचे सचिव राजीव भूषण आहेत. कोरोना साथीला नियंत्रणात आणण्यासाठी देशाच्या दृष्टीने कोणती कोरोना प्रतिबंधक लस अत्यंत प्रभावी ठरू शकेल याचा अभ्यास करून ती लस विकत घेतली जाईल. त्यासाठी किती निधी लागेल याचाही अंदाज ही समिती केंद्र सरकारला कळवेल.
भारत जी लस निवडेल, तिच्या खरेदीसाठी अब्जावधी रुपयांचा निधी लागणार आहे. तो वेळेवर उपलब्ध होण्यासाठी संबंधित खात्यांमध्ये समन्वय राखणे आदी कामे ही समिती पार पाडणार आहे. कोरोना लसनिर्मितीशी संबंधित महत्त्वाच्या संस्था, तसेच विविध खात्यांचे अधिकारी या समितीचे सदस्य आहेत.
कोरोनाची लस विकसित झाल्यानंतर तिचा पुरवठा विनाअडथळा व्हावा, तसेच या लसीशी संबंधित अन्य मुद्यांवर केंद्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी झालेल्या एका बैठकीत सविस्तर चर्चा केली. त्याचवेळी कोरोना प्रतिबंधक लसीच्या खरेदी, वितरणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. या समितीमध्ये एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया तसेच जैवतंत्रज्ञान, माहिती-प्रसारण मंत्रालय, आरोग्य सेवा संचालक, एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च, तसेच राज्यांचेही प्रतिनिधी असणार आहेत.
राज्यांनाही खरेदीचे अधिकार मिळणार?
परदेशातून कोरोना लसीची खरेदी करताना एखाद्या विदेशी संस्थेला त्या प्रक्रियेत समाविष्ट करून घ्यायचे की राज्यांनाच परस्पर लस खरेदीचे अधिकार द्यायचे, या विषयावरही केंद्र सरकामधील ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत चर्चा झाली. कोणती कोरोना लस विकत घ्यावी यासंदर्भात केंद्र सरकार गावी, त्याचप्रमाणे जागतिक आरोग्य संघटनेशी चर्चा करीत आहे. कोरोना लस विकसित झाली की, तिचा मोठा साठा भारत विकत घेणार आहे.