coronavirus: मोदी सरकार पुन्हा लॉकडाऊनवर करतंय विचार? प्रकाश जावडेकरांनी दिलं असं उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 06:28 PM2021-03-23T18:28:55+5:302021-03-23T18:29:55+5:30
Coronavirus in India : फेब्रुवारी महिन्यापासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यातच मार्च महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे.
नवी दिल्ली - जानेवारी महिन्यामध्ये देशातील कोरोनाचा (Coronavirus)संसर्ग जवळपास नियंत्रणात आला असे वाटत असतानाच फेब्रुवारी महिन्यापासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली होती. त्यातच मार्च महिन्यात देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये तर काही मोठ्या शहरांत लॉकडाऊन (lockdown ) करण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. दरम्यान, देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार लॉकडाऊनचा विचार करतंय का? अशी विचारणा केली असता केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी सूचक उत्तर दिले आहे. (Modi government thinking of lockdown again? The answer given by Prakash Javadekar)
आज केंद्रीय कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेत बैठकील निर्णयांची माहिती घेतली. यावेळी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वाढत असलेल्या निर्बंधांमुळे लॉकडाऊन लागणार का, अशी शंका लोकांच्या मनात निर्माण झाली आहे, अशी विचारणा केली असता प्रकाश जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकार ज्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, आम्ही अशा राज्यांच्या सातत्याने संपर्कात आहे. कोरोना व्यवस्थापनाचे उपाय गतवर्षी सर्व लोकांनी पाहिले आहेत. आताही कोरोना व्यवस्थापन रोग्य रीतीने झाले तर कोरोनाचा फैलाव होणार नाही. जावडेकर यांच्या म्हणण्याचा अर्थ सरकारकडून लॉकडाऊन लावण्याबाबत किंवा थांबवण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, देशातील वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणाबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आता देशभरात सुरू झालेल्या कोरोना लसीकरणाची व्याप्ती वाढवण्यात येणार आहे. आज कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयानुसार येत्या १ एप्रिलपासून देशातील ४५ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला कोरोनावरील लस देण्यात येणार आहे.
आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीनंतर माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. देशातील ४५ वर्षांवरील सर्व व्यक्तींना १ एप्रिलपासून कोरोनावरील लस दिली जाईल भारताकडे कोरोनावरील लसीचे पुरेसे डोस आहेत. तसेच भारतात अनेक लसी चाचणीच्या टप्प्यात आहेत, असेही जावडेकर यांनी यावेळी सांगितले.