Coronavirus: मोदींच्या आवाहनाला मातोश्रींची साथ; पीएम केअर्स फंडाला दिला मदतीचा हात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 08:21 PM2020-03-31T20:21:02+5:302020-03-31T20:22:04+5:30
आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईनंसुद्धा पीएम केअर्स फंडाला मदत दिली आहे. मोदींची आई हिरा बेन हिनं २५ हजार रुपयांची देगणीच्या स्वरूपात मदत केली आहे.
नवी दिल्ली- कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी मोदी सरकारनं लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान केअर्स फंडही सुरू केला आहे. या फंडाला मदत करण्यासाठी अनेक उद्योगपती आणि व्यावसायिक पुढे सरसावले आहेत. जो तो आपापल्या परीनं या फंडाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. टाटा समूह आणि मुकेश अंबानींच्या रिलायन्स समूहानं या फंडाला भरघोस मदत जाहीर केली आहे. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईनंसुद्धा पीएम केअर्स फंडाला मदत दिली आहे. मोदींची आई हिरा बेन हिनं २५ हजार रुपयांची देगणीच्या स्वरूपात मदत केली आहे. त्यांनी जमवलेल्या रकमेतून पीएम फंडाला हे पैसे दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री हिरा बेन ९८ वर्षांच्या असून, त्या गुजरात गांधीनगरमधील रायसीन गावात वास्तव्याला आहेत. नरेंद्र मोदींचे लहान बंधू पंकज मोदींसोबत त्या राहतात. पंतप्रधान मोदींनी घोषणा केलेल्या जनता कर्फ्यूलाही त्यांनी थाळीनादाच्या माध्यमातून प्रतिसाद दिला होता. आपात्कालीन परिस्थितीसाठी मोदी केअर्स हा फंड बनवण्यात आला असून, कोरोना व्हायरसविरोधात सुरू असलेल्या लढ्याला सर्वसामान्यांच्या माध्यमातून या फंडाला मदत दिली जात आहे.
कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वसामान्यांबरोबर देशभरातील उद्योगपती आपापल्यापरीनं मदत करत असून, टाटा ग्रुपने १५०० कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मुकेश अंबानी आणि टाटा ग्रुपच्या रतन टाटांनी सर्वाधिक मदत केली आहे.