coronavirus: 'मोदींच्या वाराणसीत विदारक स्थिती, लॉकडाऊनमुळे गवत खाण्याची उद्भवली परिस्थिती'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 04:27 PM2020-03-26T16:27:32+5:302020-03-26T16:31:46+5:30
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पॅकेज जाहीर केले
वाराणसी - कोरोनामुळे देशाच्या विकासाची चाके थांबली आहेत. यामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. तर उद्योगधंदे बंद झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने मोठे मदतीचे पॅकेज जाहीर केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वंकष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी आज दुपारी कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे झालेल्या नुकसानीवरून दिलासा देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली. गरीबांसाठी, कामगारांना तात्काळ मदत देण्यासाठी, ग्रामीण भागातील लोकांना मदत देण्यासाठी 1.7 लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करत आहे. है पैसे नागरिकांच्या थेट खात्यामध्ये टाकण्यात येतील, असे सीतारामन यांनी सांगितले. मात्र, लॉकडाऊनमुळे गरीब अन् हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची भुकमारी होत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणस मतदारसंघातच नागरिकांनी चक्क गवत खाऊन दिवस काढल्याचं वृत्त समोर आलं आहे.
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत १.७० लाख कोटी रुपयांचे पॅकेज देण्यात आले आहे. कुणीही भुकेला राहू नये आणि हातात पैसेही असावेत, या उद्देशाने अर्थमंत्र्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पॅकेज जाहीर केले. मात्र, लॉकडाऊननंतरची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. वाराणसीतील मुसहर समाजाला आता कोरोनामुळे त्रस्त व्हावं लागत आहे. वाराणसी येथील कोईरीपुर मुसहर वस्तीत लॉक डाऊनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या ३ दिवसांपासून येथील घरात चूल पेटली नाही. आपल्या पोटाची भूक भागविण्यासाठी येथील लोकं चक्क गवत खात आहेत. या समाजातील लोकांकडे मास्क आणि सॅनिटायझर्स सोडा, पण हात धुवायला साबणही नाही. हीच परिस्थिती पिंडरा येथील वस्त्यांवरही दिसून येतेय. घरात रेशन आणि अन्न धान्य नसल्याने येथील नागरिकांच्या घरात चूलच पेटत नाही.
काँग्रेस नेते शशी थरुर यांनी या संदर्भातील बातमी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केली आहे. तसेच, आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणीही केली. विशेष म्हणजे थरुर यांच्या मागणीनंतर काही तासातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकार परिषद घेऊन आर्थिक पॅकेज जाहीर केलं आहे. थरुर यांनी वारणसीतील विदारक परिस्थिती मांडत, मोदी सरकारवर टीका केली. सोचा नही था इतने अच्छे दिन आयेंगे, वाराणसी के लोग भी घास खायेंगे, असे ट्विट थरुर यांनी केले आहे.
दरम्यान, कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. आपण या संकटप्रसंगी गरिबांच्या प्रती करुणा दाखवू शकतो. आता नवरात्र सुरू आहे. या निमित्ताने आपण पुढील 21 दिवस 9 गरीब कुटुंबाचे पालन करण्याची जबाबदारी घेतली, तर नवरात्र यशस्वी होईल, असे मोदींनी वाराणसी येथील नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधताना म्हटले. या शिवाय आपल्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांचीही काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज जनतेला केले. संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसबरोबरच्या लढाल्या सुरुवात केल्यानंतर, त्यांनी बुधवारी वाराणसीतील जनतेशी संवाद साधला.