Coronavirus: कोरोनाच्या ‘या’ औषधावर सरकारनं केले अलर्ट; युवकांवर होतोय वाईट परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2022 03:37 PM2022-01-12T15:37:11+5:302022-01-12T15:39:22+5:30
मोलनुपिराविर या औषधाचा वापर केवळ ६० वर्षावरील कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णांसाठी करण्यात यावा असं तज्ज्ञांनी सांगितले आहे.
नवी दिल्ली – देशात एकीकडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोना उपचारासाठी वापरण्यात येत असलेल्या औषधाबद्दल वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. कोरोनाचं अँन्टिव्हायरल औषध मोलनुपिराविर (Molnupiravir) हे उपचारासाठी रामबाण मानलं जात आहे. परंतु या औषधाच्या वापरावरुन सरकारने लोकांना अलर्ट केले आहे.
ICMR नं सध्या हे औषध कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी बनवण्यात आलेल्या क्लिनिकल प्रोटोकॉलमध्ये समाविष्ट करणार नाही हे स्पष्ट केले आहे. ICMR ने म्हटलंय की, हे औषध युवकांमध्ये, अविवाहित महिला आणि गर्भवती महिलांमध्ये संतती नियमनाच्या क्षमतेवर वाईट परिणाम टाकू शकतात. आरोग्य मंत्रालयाने लसीसाठी बनवलेल्या टेक्निकल सल्लागार कमिटीचे चीफ डॉ. एन. के अरोडा यांनीही कुठल्याही परिस्थितीत या औषधाचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे.
सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर या औषधाचा वापर नको
तज्ज्ञांच्या मते, मोलनुपिराविर या औषधाचा वापर केवळ ६० वर्षावरील कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या रुग्णांसाठी करण्यात यावा. जोपर्यंत या औषधाची डिटेल्स स्टडी समोर येत नाही तोवर प्रत्येक रुग्णांसाठी या औषधाचा वापर करण्यापूर्वी विचार करावा लागेल. विशेष म्हणजे सौम्य लक्षणांचे रुग्ण आणि होम आयसोलेशन असणाऱ्या रुग्णांना हे औषध देऊ नका.
DCGI नं आपत्कालीन वापरासाठी दिली परवानगी
या औषधाला भारतीय औषध नियंत्रक आयोगाने २८ डिसेंबरला कोरोनाच्या गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी या औषधाचा वापर करण्यास मंजुरी दिली आहे. या औषधाचा फायदा ६० वर्षावरील वृद्ध किंवा इतर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना फायदेशीर आहे. परंतु अनेक डॉक्टर हे औषध युवकांनाही देत आहेत. त्यामुळे तज्ज्ञांनी या औषधाचा वापर टाळण्याचा सल्ला दिला आहे.
हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापासून वाचवते हे औषध
या औषधाची निर्मिती करणाऱ्या कंपनीने दावा केलाय की, कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या ५ दिवसांच्या कालावधीत हे औषध दिल्यास रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती होण्यापासून आणि मृत्यूचा धोका टळतो. भारतातील १३ कंपन्या हे औषध बनवण्याची तयारी करत आहे. सध्या हे औषध केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णाला उपलब्ध होऊ शकतं.