CoronaVirus: 'त्या' १५ लाख प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवा; केंद्राचे सर्व राज्यांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 10:32 PM2020-03-27T22:32:21+5:302020-03-27T22:33:42+5:30
१८ जानेवारी ते २३ मार्च दरम्यान देशात आलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना
नवी दिल्ली: दोन महिन्यांत परदेशातून आलेल्या १५ लाख प्रवासांना निरीक्षणाखाली ठेवण्याच्या सूचना केंद्राकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत. १८ जानेवारी ते २३ मार्च या कालावधीत भारतात १५ लाख प्रवासी आले. सध्या यातील काही प्रवासी निरीक्षणाखाली आहेत. मात्र निरीक्षणाखाली नसलेल्या प्रवाशांची संख्या अतिशय मोठी आहे. या सर्व प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्याची सूचना केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांनी केली आहे. आता या प्रवाशांना शोधून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्याचं आव्हान राज्यांसमोर आहे.
राजीव गौबा यांनी याबद्दल प्रधान सचिवांना पत्र लिहिलं असून त्या माध्यमातून परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती दिली आहे. 'परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची १८ जानेवारीपासून विमानतळांवर तपासणी सुरू करण्यात आली. २३ मार्चपर्यंत ही तपासणी सुरू होती. इमिग्रेशन ब्युरोनं अशा १५ लाखांहून अधिक प्रवाशांची यादी तयार केली आहे. ती त्यांनी राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवली आहे. मात्र विमानतळांवर तपासणी करण्यात आलेल्या प्रवाशांच्या संख्येत आणि राज्यं/केंद्रशासित प्रदेशांनी तपासणी केलेल्या प्रवाशांच्या संख्येत तफावत आहे,' असं गौबा यांनी पत्रात म्हटलं आहे.
कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी परदेशातून आलेल्या प्रवाशांवर नजर ठेवणं गरजेचं असल्याचंदेखील गौबा यांनी त्यांच्या पत्रात नमूद केलं आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं वारंवार याबद्दलची गरज व्यक्त केली होती, याकडेही त्यांनी पत्रातून लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशातून आलेल्या प्रवाशांना निरीक्षणाखाली ठेवण्याासाठी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रशासनांनी तातडीनं पावलं उचलावीत, असं गौबा यांनी पत्रात म्हटलं आहे.