CoronaVirus News: देशामध्ये दिवसभरात १३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 05:03 AM2020-06-20T05:03:31+5:302020-06-20T06:47:35+5:30
एकूण रुग्णांची संख्या आता ३ लाख ८० हजारांच्यावर
नवी दिल्ली : देशामध्ये गुरुवारी एका दिवसात ‘कोविड-१९’चा संसर्ग झालेले १३ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णांची संख्या आता
३ लाख ८० हजारांच्यावर गेली आहे.
कोरोना विषाणूचा सध्या सुरू असलेला कहर कमी होण्याची चिन्हे नाहीत. सध्या १,६३,२४८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर पूर्ण बरे झालेल्यांची संख्या २,०४,७११ आहे. उपचार सुरू असलेल्यांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे ही चांगली गोष्ट असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. देशात गुरुवारी ३३६ जणांचा बळी गेला. या आजारातील मृतांची एकूण संख्या १२ हजारांपेक्षा अधिक झाली आहे.
दिल्ली शहर आणि आजूबाजूच्या शहरांत पसरलेली साथ नियंत्रणात आणण्यासाठी एक सामायिक धोरण आखण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. दिल्लीमध्ये दररोज होणाºया चाचण्यांची संख्या आणखी वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
सामायिक धोरण हवे : अमित शहा
दिल्लीला लागून असलेल्या नोएडा, गाझियाबाद, गुरगाव, फरिदाबाद या शहरांत साडेसात हजारांपेक्षा अधिक रुग्ण असून १४२ जणांचा बळी गेला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, ‘कोविड-१९’ विरोधात सुरू असलेल्या लढ्यात केवळ दिल्लीचाच नव्हे तर त्याला लागून असलेल्या शहरांचाही विचार करावा लागेल. या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी या शहरांकरिता एक सामायिक उपाययोजना करावी लागेल.