Coronavirus : देशभरात आढळले १६ हजारांहून अधिक नवे रुग्ण; ९१,३६१ जणांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2022 05:37 AM2022-01-01T05:37:39+5:302022-01-01T05:38:03+5:30
Coronavirus : केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा आकडा ३ कोटी ४८ लाख ३८ हजार ८०४ असून त्यातील ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २६३ जण बरे झाले. १६,७६४ नवे रुग्ण आढळले असून ९१,३६१ जणांवर उपचार सुरू आहेत.
नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १६ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले व २२० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. कोरोना रुग्णांचा एकूण आकडा ३ कोटी ४८ लाख झाला आहे, तर उपचार सुरू असलेल्यांची संख्या वाढून ती ९५ हजारांवर पोहोचली आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना रुग्णांचा आकडा ३ कोटी ४८ लाख ३८ हजार ८०४ असून त्यातील ३ कोटी ४२ लाख ६६ हजार २६३ जण बरे झाले. १६,७६४ नवे रुग्ण आढळले असून ९१,३६१ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोनाने आजवर मरण पावलेल्यांची संख्या ४ लाख ८१ हजार ८० झाली आहे. २७ डिसेंबर रोजी एकाच दिवसात १६,१५६ नवे रुग्ण सापडले होते. उपचार घेत असलेल्यांमध्ये गेल्या २४ तासांत ८,९५९ जणांची वाढ झाली. एकूण रुग्णांपैकी ९८.३६ टक्के लोक बरे झाले व उपचाराधीनांचे प्रमाण ०.२६ टक्के आहे. दररोजचा व दर आठवड्याचा संसर्गदर अनुक्रमे १.३४ व ०.८९ टक्के आहे. कोरोना रुग्णांचा मृत्युदर १.३८% नोंदविण्यात आला. देशभरात कोरोना लसीचे १४४. ५४ कोटी डोस देण्यात आले आहेत.
राष्ट्रपती भवन दर्शन दौराही बंद
ओमायक्राॅनचा वाढता प्रसार लक्षात घेऊन राष्ट्रपती भवन व तेथील संग्रहालयाचा दर्शन दौरा शनिवारपासून बंद करण्यात आला आहे. तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत या भवनातील चेंज ऑफ गार्ड हा सोहळाही होणार नाही.