CoronaVirus News: कोरोनामुळे देशातील ५००हून अधिक डॉक्टरांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2020 04:21 AM2020-10-04T04:21:46+5:302020-10-04T06:55:58+5:30
CoronaVirus News: धक्कादायक! केवळ ६२ जणांना विम्याचा लाभ; इंडियन मेडिकल असोसिएशनची माहिती
मुंबई : इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या तब्बल ५१५ डॉक्टरांचा कोरोनामुळे बळी गेला. यातील २९२ डॉक्टर राज्यातील आहेत. कोरोना रुग्णांची सेवा करताना झालेल्या संसर्गामुळे या डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती आयएमएने दिली. दुर्दैवी बाब म्हणजे यातील केवळ ६२ डॉक्टरांच्या कुटुंबीयांनाच सरकारने जाहीर केलेल्या विम्याचा लाभ मिळाला.
देशभरातील १ हजार ७४६ शाखांमधून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या डॉक्टरांची आकडेवारी समोर आली. हे सर्व अॅलोपॅथी शाखेतील डॉक्टर आहेत. मात्र, कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या डॉक्टरांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आयएमएचे अध्यक्ष डॉ. राजन शर्मा यांनी व्यक्त केली.
आयएमएच्या माहितीनुसार, देशात १९४ रुग्णांमागे एक डॉक्टर असे प्रमाण आहे. कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टरांमध्ये २०१ डॉक्टर ६० ते ७० वयोगटातील आहेत. तर १७१ डॉक्टर्स ५० ते ६० वयोगटातील आहेत. सत्तरपेक्षा अधिक वय असणाऱ्या ६६ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ३५ ते ५० वयोगटातील ५९ आणि ३५ पेक्षा कमी वय असणाºया १८ डॉक्टरांना जीव गमवावा लागला. मात्र केंद्र सरकारकडे कोरोनामुळे जीव गमावलेल्या डॉक्टरांविषयी कोणताही डेटा नसल्याची माहिती डॉ. शर्मा यांनी दिली.
८७ हजार बाधित
आतापर्यंत देशभरातील ८७ हजार वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रंटलाइनर्स कोविड योद्ध्यांसाठी जाहीर केलेल्या विमा योजनेचा लाभ ५१५ पैकी केवळ ६२ डॉक्टरांना मिळाला. अजूनही १३० विमा प्रतीक्षेत आहेत. शिवाय, अजूनही काही राज्यांकडून विम्यासाठीची सर्व कागदपत्रे आलेली नाहीत. केंद्राने डॉक्टरांच्या माहितीचा डेटाबेस तयार करायला हवा, अशी मागणी डॉ. शर्मा यांनी केली.