Coronavirus: देशातील निम्म्यांहून अधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्लीमध्ये; एकूण बळी १६ हजार ८९३

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 03:44 AM2020-07-01T03:44:01+5:302020-07-01T03:44:13+5:30

बाधितांची संख्या ५ लाख ६६ हजार, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत सुमारे ४ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Coronavirus: More than half of the country's patients in Maharashtra, Tamil Nadu, Delhi | Coronavirus: देशातील निम्म्यांहून अधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्लीमध्ये; एकूण बळी १६ हजार ८९३

Coronavirus: देशातील निम्म्यांहून अधिक रुग्ण महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्लीमध्ये; एकूण बळी १६ हजार ८९३

Next

नवी दिल्ली : गेल्या २४ तासांत १८ हजार ५२२ जण पॉझिटिव असल्याचे आढळून आल्याने देशात कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी ५ लाख ६६ हजार ८४० झाली आहे. तामिळनाडूमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत असून, आता ते राज्य दिल्लीपेक्षा पुढे गेले आहे. महाराष्ट्रानंतर सर्वाधिक रुग्ण आता तामिळनाडूमध्ये आहेत. देशात २४ तासांमध्ये ४१८ रुग्ण मरण पावले असून, कोरोनाच्या बळींची संख्या त्यामुळे १६ हजार ८९३ वर गेली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडूमध्ये गेल्या २४ तासांत सुमारे ४ हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत. तेथील एकूण बाधितांचा आकडा त्यामुळे ८६ हजार २२४ झाला असून, दिल्लीत ती संख्या ८५ हजार १६१ इतकी आहे. कर्नाटकातही रुग्ण झपाट्याने वाढत असून, गेल्या २४ तासांत सुमारे एक हजार प्रकरणे समोर आल्याने तेथील रुग्णांची संख्या १४ हजार २१० झाली आहे.

मात्र २४ तासांत सर्वाधिक म्हणजे ५२०० रुग्णांची नोंद महाराष्ट्रात झाली. त्यामुळे राज्यात एकूण बाधितांचा आकडा १ लाख ६९ हजार ८८३ झाला आहे. गुजरातमध्ये सध्या ३१ हजार ९३८ रुग्ण आहेत. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, मध्य प्रदेश हरयाणा, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांतही प्रत्येकी किमान १० हजार ते कमाल २२ हजार रुग्ण आहेत.

बिहारमधील रुग्णसंख्याही १० हजारांच्या घरात पोहोचली आहे. ही सात राज्ये आणि महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली व गुजरात येथे मिळूनच सुमारे ५ लाख रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांच्या बळींची संख्याही याच राज्यांत जास्त आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीतून स्पष्ट होते. रुग्णवाढीचा वेग पाहता, येत्या दोन दिवसांत म्हणजे गुरुवारपर्यंत देशात सुमारे ६ लाख रुग्ण असतील, असे दिसत आहे. गेले सात दिवस देशात रोज १५ हजारहून अधिक नवे रुग्ण आढळून येत आहेत.

देशात आतापर्यंत जे १६ हजार ८९३ जण मरण पावले, त्यापैकी ७६१० महाराष्ट्रातील असून, दिल्लीत आतापर्यंत २६८०, गुजरातमध्ये
१८२७, तर तमिळनाडूमध्ये ११४१ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र आतापर्यंत देशात ३ लाख ३४ हजार ८२१ जण बरे झाले असून, सध्या २ लाख १५ हजार १२५ जणांवर उपचार सुरू आहेत.

रशियात मृतांचे प्रमाण कमी
जगात कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ कोटी ४ लाख २९ हजार ५२२ असून, त्यापैकी ५ लाख ८ हजार जण मरण पावले आहेत. अमेरिकेतील रुग्णसंख्या २६ लाख ८१ हजारांवर गेली असून, तिथे आतापर्यंत या संसर्गजन्य आजाराने १ लाख २९ हजार जणांचा बळी घेतला आहे. ब्राझीलमध्ये १३ लाख ७0 हजार ५00 (मृत : ५८ हजार ३८५), रशियात ६ लाख ४७ हजार ८४९ (मृत : ९३२0) हे देश दुसऱ्या व तिसºया क्रमांकावर असून, भारत चौथ्या स्थानी आहे. रशियात भारतापेक्षा रुग्ण अधिक असले तरी तिथे मृतांची संख्या तुलनेने कमी आहे.

Web Title: Coronavirus: More than half of the country's patients in Maharashtra, Tamil Nadu, Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.