Coronavirus: नियम पाळत नसल्यानेच मुंबई, दिल्लीत जास्त रुग्ण - केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 11:10 PM2020-05-04T23:10:54+5:302020-05-04T23:11:29+5:30
ग्रामीण जनता अधिक जबाबदारीने वागते
नवी दिल्ली : मुंबई, दिल्लीमधील लोक लॉकडाऊनचे नियम नीट पाळत नसल्यामुळेच तिथे कोरोना रुग्णांचे प्रमाण इतर शहरांपेक्षा अधिक आहे, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, कोरोना साथीच्या काळात देशाच्या ग्रामीण भागातील जनता शहरी लोकांपेक्षा अधिक जबाबदारीने वागत आहे. देशातील कोरोना एकूण रुग्णांपैकी २० टक्के जण एकट्या मुंबईतील आहेत. मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. तिथे राहणाऱ्या नागरिकांना फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळणे शक्य होत नाही. विदेशवारीहून येणाºया लोकांच्या संपर्कात मजूर येण्याची शक्यता खूपच कमी आहे. ते लक्षात घेता या मजुरांमुळे कोरोनाचा फैलाव झाला, असे म्हणणे योग्य होणार नाही.
दररोज १ लाख चाचण्या
भारतामध्ये दर दहा लाख लोकांमागे फक्त ६९४ लोकांचीच कोरोना चाचणी होत आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे की, भारतात आतापर्यंत लाखो लोकांची कोरोना चाचणी झाली आहे. इतर देशांच्या तुलनेत भारतामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. देशात दररोज १ लाख लोकांची चाचणी करण्याचे लक्ष्य आहे.