Coronavirus: पुन्हा ‘बंद’कडे वाटचाल; कोरोना प्रादुर्भाव वाढत चालल्याने भीतीचे वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 12:23 AM2020-06-28T00:23:43+5:302020-06-28T08:23:59+5:30
२४ तासांत १८,५५२ रुग्ण । बाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३
नवी दिल्ली : कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या वेगाने वाढत चालला आहे, त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. देशात गेल्या २४ तासांत तब्बल १८ हजार ५५२ नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांचा आकडा ५ लाख ८ हजार ९५३ झाला आहे. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात नवे रुग्ण आढळले आहेत. मृत्यूसंख्याही २४ तासांत ३८४ ने वाढल्याने एकूण आकडा १५ हजार ६८५ झाला आहे.
देशात रुग्णांची संख्या एक लाख होण्यास १०० दिवस लागले होते. पुढील ३९ दिवसांत रुग्णांची संख्या ५ लाखांवर गेली. म्हणजेच ३९ दिवसांत तब्बल ४ लाख रुग्ण वाढले. १ जून ते २७ जून या काळात वाढलेल्या रुग्णांची संख्याच ३ लाख १८ हजार ४१८ इतकी आहे. हा वेग असाच राहिल्यास पुढील शनिवारपर्यंत देशातील एकूण रुग्णांची संख्या ६ लाखांवर गेलेली असेल, असे दिसते.
या पाच लाखांपैकी १ लाख ५२ हजार रुग्ण महाराष्ट्रात असून, दिल्लीत ७७ हजार, तमिळनाडूमध्ये ७४ हजार आणि गुजरातमध्ये ३० हजार रुग्णसंख्या झाली आहे. उत्तर प्रदेशातही रुग्णसंख्या वाढून २० हजारांवर गेली आहे. याखेरीज सात राज्यांत रुग्णसंख्या १० हजारांच्यावर आहे. महाराष्ट्रात ७१०६, दिल्लीत २४९२, गुजरातमध्ये १७७१ तर तमिळनाडूत ९५७ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातचा मृत्यूदर देशात सर्वाधिक आहे.
समाधानाची बाब ही की कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देशात वाढत असून, ते ५८.१३ टक्के झाले आहे. आतापर्यंत २ लाख ९६ हजार ८८९ जण बरे होऊ न घरी परतले आणि सध्या १ लाख ९७ हजार ३८७ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी देण्यात आली.
पुन्हा ‘बंद’कडे वाटचाल
रुग्णांमध्ये रोज प्रचंड वाढ होत असल्यामुळे रेल्वेसेवा १२ आॅगस्टपर्यंत, तर आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाला, हे उघड आहे. शाळा व महाविद्यालये कधी सुरू करायची, हे ठरवण्यात राज्यांना अडचणी येत असून, जवळपास सर्वच परीक्षा केंद्र व राज्य सरकार यांनी रद्द केल्या आहेत. याशिवाय सर्व मोठ्या शहरांत अनेक वस्त्या सील करण्यात आल्या असून, काही ठिकाणी तर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी सुरू झाली आहे. अनेक व्यापाऱ्यांनी स्वत:हून बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.