Coronavirus: माणुसकी हाच खरा धर्म! हज यात्रेसाठी जमवलेल्या पैशातून ‘त्याने’ मजुरांना अन्नधान्य वाटले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 11:40 AM2020-04-27T11:40:21+5:302020-04-27T11:53:20+5:30
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे
मंगळूर – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं जगासमोर संकट उभं केलं आहे. आतापर्यंत २९ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ लाखाहून जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातही कोरोना व्हायरसच्या वाढत्या संख्येने सरकारसमोर आव्हान उभं झालं आहे. अशातच देशात कोरोना रुग्णांचा आकडा २१ हजारांच्या वर पोहचला आहे तर आतापर्यंत ८०० पेक्षा अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.
कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज ठप्प पडलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातातलं काम बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. संकट काळात सर्व देशवासिय एकजुटीने कोरोनाचा सामना करताना दिसत आहे. या संघर्षकाळात मजुरांना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे येत आहे यामधून माणुसकीची शिकवण लोकांपर्यंत पोहचत आहे.
कर्नाटकातील मंगळूर येथील ५५ वर्षीय अब्दुरेहमान शेतमजूर म्हणून काम करतात. त्यांची आयुष्यात एकच इच्छा होती ती म्हणजे जीवनात एकदातरी हज यात्रा करुन मक्का मदीना नक्कीच पाहायचा. यासाठी गेल्या अनेक वर्षापासून ते पैसे जमवत आहेत. यावर्षी ते मक्का मदीनाला जाणार होते. पण कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे लॉकडाऊन झाला आणि सर्व रद्द करण्यात आलं. अशातच हज यात्रेसाठी जमवलेले पैसे अखेर गरीब आणि गरजूंच्या मदतीसाठी देणे त्यांना महत्त्वाचं वाटलं.
टाइम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार अब्दुरेहमान यांनी हज यात्रेसाठी जमवलेले पैसे शहरात अडकलेल्या मजुरांच्या मदतीसाठी दिले. ज्यांच्या घरात अन्नधान्य संपलं होतं अशांना किराणा मालाचं वाटप केलं. अब्दुरेहमान यांनी गरजू व्यक्तींना तांदूळ, खाण्या-पिण्याच्या वस्तू असं सामना पाठवलं. कशाप्रकारे हातावर पोट असणारे लोक लॉकडाऊनमुळे जगत असतील? याचा विचार करुन हज यात्रेसाठी जमवलेले पैसे अशा लोकांच्या मदतीसाठी खर्च करावे हा विचार माझ्या मनात आल्याने मी त्यांना मदत केली असं अब्दुरेहमान यांनी सांगितले.
इतकचं नाही तर अब्दुरेहमान यांनी गरजुंना मदतीसाठी गुप्तदानही केलं. मदतीसाठी खर्च होणारी रक्कम सांगण्यासही त्यांनी नकार दिला. अब्दुरेहमान यांचा मुलगा म्हणाला की, माझे वडील शेतमजूर म्हणून काम करतात. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी हज यात्रेला जाण्यासाठी पैसे जमा केले होते. मात्र लॉकडाऊनमुळे उपाशीपोटी झोपणाऱ्या लोकांना पाहून त्यांनी अशा लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतल्याचं तो म्हणाला.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या ‘या’ दोन नेत्यांना राजकारण न करण्याचा उपदेश द्यावा”
महसूल अधिकाऱ्यांनी दिलेल्या करवाढीच्या सल्ल्यामुळे मोदी सरकार संतप्त, दिले चौकशीचे आदेश
किम जोंग उन जिवंत; दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांचा मोठा खुलासा
Corona Virus : पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल Shoaib Akhtarचं मोठं विधान; म्हणाला...